सर्वोच्च न्यायालयाने मोहम्मद शमीच्या पत्नीला फटकारले (Photo Credit - X)
Mohammed Shami Supreme Court Case: भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) सध्या टीम इंडियापासून दूर असून पुनरागमनासाठी संघर्ष करत आहे. दरम्यान, तो त्याची पत्नी हसीन जहाँ पासून वेगळा राहत असून, हसीन जहाँने पोटगीत वाढ करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हसीन जहाँला थेट सवाल विचारत शमीला अप्रत्यक्ष पाठिंबा दिला आहे.
Mohammed Shami’s wife moves Supreme Court for ₹10 lakh monthly maintenance Read here: https://t.co/gfJsSIWYPG pic.twitter.com/LZnmScb6a3 — Bar and Bench (@barandbench) November 7, 2025
हसीन जहाँने पोटगीत वाढ करण्याची याचिका दाखल केल्यानंतर, सर्वोच्च न्यायालयाने यावर नोटीस बजावली आहे. यापूर्वी, कोलकाता उच्च न्यायालयाने शमीला हसीन जहाँला दरमहा १.५ लाख रुपये आणि मुलीला २.५ लाख रुपये असे एकूण ४ लाख रुपये पोटगी म्हणून देण्याचे आदेश दिले होते.
यावर हसीन जहाँने शमीचे उत्पन्न आणि जीवनशैली लक्षात घेता ही रक्कम अपुरी असल्याचा युक्तिवाद केला आणि १० लाख रुपये पोटगीची मागणी केली. परंतु, सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने विचारले “दरमहा ४ लाख रुपये आधीच खूप जास्त नाही का?” खंडपीठाने आता शमी आणि पश्चिम बंगाल सरकारकडून चार आठवड्यांच्या आत उत्तर मागितले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी डिसेंबरमध्ये होणार आहे.
मोहम्मद शमी आणि मॉडेल हसीन जहाँ यांनी २०१४ मध्ये लग्न केले होते, मात्र २०१८ मध्ये दोघे कायदेशीररित्या वेगळे झाले. नुकतेच, हसीन जहाँने एका सोशल मीडिया पोस्टमध्ये शमीवर गंभीर आरोप केले आहेत. हसीन जहाँने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत आमचे नाते मजबूत राहील, इंशाअल्लाह.
आता हे नाते कोणत्या प्रकारची ताकद असेल हे ठरवायचे आहे.” ती पुढे म्हणते, “आम्ही सात वर्षांपासून कायदेशीर लढाई लढत आहोत. यातून तुम्हाला काय मिळाले? तुम्ही चारित्र्यहीन, लोभी आणि स्वार्थी असल्याने तुम्ही तुमचे स्वतःचे कुटुंब उद्ध्वस्त केले आहे.” शमीने शेवटचा सामना चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये भारतासाठी खेळला होता.






