श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणे आणि सूर्यकुमार यादव(फोटो-सोशल मिडिया)
T20 Mumbai League : मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) ने मंगळवारी जाहीर केलेल्या बहुप्रतिक्षित टी-२० मुंबई लीग २०२५ साठी आयकॉन खेळाडूंच्या यादीत भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर आणि अजिंक्य रहाणे यांच्यासह देशासाठी खेळलेल्या आठ खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. सहा वर्षांच्या अंतरानंतर टी-२० मुंबई लीगचे पुनरागमन होत आहे. त्याचे तिसरे सत्र २६ मे ते ८ जून दरम्यान वानखेडे स्टेडियमवर आयोजित केले जाईल. सूर्यकुमार, रहाणे आणि अय्यर यांच्याशिवाय आयकॉन खेळाडूंमध्ये सरफराज खान, शार्दुल ठाकूर, पृथ्वी शॉ, शिवम दुबे आणि तुषार देशपांडे यांचा समावेश आहे.
हेही वाचा : पहलगाम हल्ल्यावर शिखर धवनने शाहिद आफ्रिदीला फटकारले, म्हणाला – किती खालच्या पातळीवर जाणार…
एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक म्हणाले, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मुंबईला अभिमान वाटणाऱ्या आयकॉन आठ खेळाडूंची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. ते मुंबई क्रिकेटच्या भावनेचे, वारशाचे आणि उत्कृष्टतेचे प्रतिनिधित्व करतात. त्यांची उपस्थिती केवळ उदयोन्मुख प्रतिभांना प्रेरणा आणि मार्गदर्शन करणार नाही तर त्यांना शिकण्याची एक उत्तम संधी देखील प्रदान करेल, असे ते पुढे म्हणाले. प्रत्येक फ्रँचायझीला त्यांच्या संघात एक आयकॉन खेळाडू निवडण्याची परवानगी असेल, ज्यामुळे संघांना अनुभव आणि स्टार पॉवर दोन्ही मिळतील. एमसीए लवकरच लिलावाची तारीख जाहीर करेल. या टी-२० लीगमध्ये आठ फ्रँचायझी संघ सहभागी होत आहेत.
हेही वाचा : DC vs KKR : नरेन – वरुण चक्रवर्तीच्या फिरकीसमोर दिल्लीचे फलंदाज फेल! कोलकाताने DC ला 14 धावांनी केलं पराभूत
मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून त्यांच्या सर्व भारतीय खेळाडूंना टी-२० मुंबई लीगमध्ये सहभागी होणे अनिवार्य करण्यात आले आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशकडून अलीकडेच भारताचा एकदिवसीय आणि कसोटी कर्णधार रोहित शर्माला त्यांच्या टी-२० मुंबई लीगचा चेहरा म्हणून घोषित करण्यात आले होते. एमसीएच्या एका अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले की, मुंबईकडून खेळणाऱ्या सर्व भारतीय खेळाडूंना सांगण्यात आले आहे की, त्यांना आयपीएलनंतर सुरू होणाऱ्या टी-२० मुंबई लीगमध्ये खेळावे लागणार आहे. भारताशी समर्पित किंवा जखमी खेळाडूंना वगळता हे अनिवार्य असणार आहे.
नॉर्थ मुंबई पँथर्स, ट्रायम्फ नाईट्स मुंबई नॉर्थ ईस्ट, एआरसीएस अंधेरी, नमो वांद्रे ब्लास्टर्स, आकाश टायगर्स मुंबई वेस्टर्न सबर्ब्स, ईगल ठाणे स्ट्रायकर्स, सोबो मुंबई फाल्कन्स आणि मुंबई साउथ सेंट्रल मराठा रॉयल्स या फ्रँचायझी टी-२० मुंबई लीग २०२५ सहभागी होणार आहे.