नवी दिल्ली : BCCI मधील प्रशासक समितीचे (COA) माजी अध्यक्ष विनोद राय यांनी माजी भारतीय कर्णधार विराट कोहली आणि अनुभवी लेगस्पिनर अनिल कुंबळे यांच्यातील वादाबद्दल मोठा खुलासा केला आहे. २०१७ मध्ये माजी कर्णधार विराट कोहली आणि तत्कालीन मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यात वाद झाला होता. या घटनेनंतर अनिल कुंबळेने भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा जाहीर राजीनामा दिला. आता सीओएचे माजी अध्यक्ष विनोद राय यांनी यावर मोठा खुलासा केला आहे.
विनोद राय यांनी त्यांच्या ‘नॉट जस्ट अ नाईटवॉचमन’ या पुस्तकात लिहिले आहे की, ‘कर्णधार आणि संघ व्यवस्थापनाशी झालेल्या माझ्या संभाषणात अनिल कुंबळे शिस्तीच्या बाबतीत खूप कडक असल्याचे सांगण्यात आले. त्याच्या काटेकोरपणामुळे संघातील सदस्य त्याच्यावर फारसे खूश नव्हते. याबाबत मी विराट कोहलीशी बोललो तेव्हा त्यानेही हे सांगितले. विराट कोहली म्हणाला होता की, अनिल कुंबळेच्या कामाच्या पद्धतीमुळे टीमचे तरुण सदस्य खूप घाबरायचे.
विराट कोहलीसोबतच्या या संभाषणाबद्दल विनोद राय यांनी अनिल कुंबळे यांच्याशीही चर्चा केली आणि त्यांनी त्यांच्या पुस्तकातही याबाबत उल्लेख केला आहे. विनोद राय यांनी लिहिले की, ‘कुंबळेसोबत माझी दीर्घ चर्चा झाली. हे प्रकरण ज्या पद्धतीने समोर आणले गेले त्यामुळे कुंबळे चांगलाच नाराज झाला. कुंबळेला वाईट वाटले. संघात शिस्त आणि व्यावसायिकता आणणे ही प्रशिक्षकाची जबाबदारी आहे, असे कुंबळेला वाटले आणि वरिष्ठ असल्याने खेळाडूंनी त्यांच्या विचारांचा आदर करायला हवा होता.
राय म्हणाला, ‘कुंबळेनेही गोष्टी स्वत:कडेच ठेवल्या आणि कोणत्याही मुद्द्यावर सार्वजनिक प्रतिक्रिया दिली नाही. अशा परिस्थितीला सामोरे जाण्याचा हा सर्वात परिपक्व आणि आदरपूर्ण मार्ग होता जो सहभागी सर्व पक्षांसाठी अप्रिय असू शकतो. २०१७ मध्ये विराट कोहलीसोबत झालेल्या वादानंतर अनिल कुंबळेला प्रशिक्षकपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. अनिल कुंबळेसोबत माजी कर्णधार विराट कोहली अजिबात तयार होत नव्हता.