Elon Musk च्या Starlink ला टक्कर देणार अमेरिकेची 'ही' कंपनी, या दिवशी लाँच करणार पहिलं सॅटेलाईट इंटरनेट
भारतात आपली सॅटेलाईट इंटरनेट सेवा सुरु करण्यासाठी एलन मस्कची स्टारलिंरक कंपनी सज्ज झाली आहे. सर्वासाठी इंटरनेट सेवा सुरु करण्यापूर्वी अनेक चाचण्या घेतल्या जात आहेत. एवढचं नाही तर कंपनीने एअरटेल आणि जिओसोबत देखील भागिदारी केली आहे. त्यामुळे युजर्सना फास्टेट इंटरनेट सेवेचा वापर करता येऊ शकतो. आता एलन मस्क केवळ भारत सरकारच्या मंजूरीची वाट पाहत आहे. सरकारने मंजूरी देताच कंपनी त्यांची सॅटेलाईट इंटरनेट सेवा भारतात सुरु करणार आहे.
एलन मस्कच्या स्टारलिंरक कंपनीला आता आव्हान देण्यासाठी आणखी एक अमेरिकन कंपनी सज्ज झाली आहे. अमेरिकेची दिग्गज कंपनी Amazon देखील त्यांची सॅटेलाईट इंटरनेट सेवा सुरु करण्याच्या तयारीत आहे. Amazon त्यांच्या प्रोजेक्ट कुइपर अंतर्गत 27 नवीन इंटरनेट उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. हे प्रक्षेपण 10 एप्रिल रोजी युनायटेड लाँच अलायन्स (ULA) च्या अॅटलस व्ही रॉकेटचा वापर करून केले जाईल. प्रोजेक्ट कुइपरचे उद्दिष्ट जगभरात इंटरनेटची सुविधा पोहोचवणे आहे. ही इंटरनेट सुविधा विशेषतः अशा भागात सुरु केली जाणार आहे, ज्या ठिकाणी अद्याप हाय-स्पीड इंटरनेटची सुविधा नाही. (फोटो सौजन्य – Pinterest)
यापूर्वी, अमेझॉनने ऑक्टोबर 2023 मध्ये 2 चाचणी उपग्रह प्रक्षेपित केले होते. आता ही पहिलीच वेळ असेल जेव्हा कंपनी त्यांचे उपग्रह मोठ्या प्रमाणात तैनात करेल. त्यामुळे आता संपूर्ण जगाला केवळ मस्कची स्टारलिंक सॅटेलाईट इंटरनेट सेवाच नाही तर Amazon ची सॅटेलाईट इंटरनेट सर्विस देखील अनुभवायला मिळणार आहे.
हे उपग्रह अमेरिकेतील फ्लोरिडा येथील केप कॅनावेरल स्पेस फोर्स स्टेशनवरून प्रक्षेपित केले जातील. ते 10 एप्रिल रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी 12:30 वाजता लाँच केले जाऊ शकते. Amazon आणि ULA च्या अधिकृत वेबसाइट्स किंवा YouTube चॅनेलवर या लाँचिंगचे लाईव्ह प्रक्षेपण दाखवलं जाणार आहे. हे प्रक्षेपण देखील खास आहे कारण हे ULA चे वर्षातील पहिले मोठे अभियान आहे आणि आतापर्यंतचे सर्वात वजनदार प्रोजेक्ट कुइपर पेलोड त्यात पाठवले जाईल.
प्रोजेक्ट कुइपरचे हे उपग्रह पृथ्वीच्या कमी कक्षेत (LEO) राहून इंटरनेट सेवा प्रदान करतील. ज्या ठिकाणी अद्याप जलद इंटरनेट उपलब्ध नाही अशा ठिकाणी ब्रॉडबँड सेवा प्रदान करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. हे उपग्रह जलद आणि अखंड इंटरनेट प्रदान करतील. या प्रकल्पांतर्गत Amazon एकूण 3,200 उपग्रह पाठवेल, जे Space-X च्या स्टारलिंक प्रकल्पासारखे काम करतील.
भारतात स्टारलिंकला मंजुरी मिळाल्यानंतर, इतर कंपन्यांना हिरवा कंदील मिळणे सोपे होईल. यासाठी सरकार काही अटी शर्ती देखील जाहीर करण्याची शक्यता आहे. काही अहवालांमध्ये असे म्हटले जात आहे की स्टारलिंकनंतर सरकार कुइपरलाही हिरवा कंदील देऊ शकते. मात्र अद्याप याबाबत कोणतंही अधिकृत विधान समोर आलं नाही. जर सरकारने दोन्ही सॅटेलाईट इंटरनेट सेवांना मान्यता दिली तर दुर्गम भागात इंटरनेटचा वापर करणं अधिक सोपं होणार आहे.