Elon Musk नंतर आता Jeff Bezos ची भारतावर नजर! टेलिकॉम बाजारात होणार मोठा बदल, लवकरच सुरु होणार नवीन सॅटेलाइट इंटरनेट सर्विस
भारतातील टेलिकॉम कंपनीत लवकरच मोठा बदल होणार आहे. मोठ्या टेक कंपन्या आता भारतात आपलं स्थान निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून एलन मस्क त्यांची सॅटेलाईट इंटरनेट सेवा भारतात सुरु करण्यासाठी प्रयत्न करत होता. भारताच्या दुर्गम भागात ज्या ठिकाणी नेटवर्कची सुविधा नाही, अशा ठिकाणी राहणाऱ्या लोकांना कोणत्याही अडचणी शिवाय नेटवर्कचा वापर करता यावा, असं स्टारलिंकचं उद्देश होतं.
अनेक महिने प्रयत्न केल्यानंतर आता अखेर स्टारलिंकला भारतात हिरवा कंदील मिळाला आहे. 2025 च्या अखेरपर्यंत भारतात स्टारलिंकची इंटरनेट सेवा सुरु केली जाणार आहे. केवळ मस्कच नाही तर ॲमेझॉनचे मालक जेफ बेझोस यांची देखील भारतावर नजर आहे. ॲमेझॉन त्यांच्या प्रोजेक्ट ‘कुइपर’ च्या मदतीने भारतात सॅटेलाईट इंटरनेट सेवा सुरु करण्याच्या प्रयत्नात आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
ॲमेझॉनने प्रोजेक्ट ‘कुइपर’ च्या मदतीने भारतात सॅटेलाईट इंटरनेट सेवा सुरु करता यावी, यासाठी दूरसंचार विभाग (DoT) ला संपर्क केला आहे. भारतात प्रोजेक्ट कुइपर सुरु करण्यासाठी ‘Letter of Intent’ (LoI) ची आवश्यकता आहे. कंपनी यासाठी प्रयत्न देखील करत आहे. खरं तर कुइपरने स्टारलिंकपूर्वीच मंजूरीसाठी अर्ज दिला होता. मात्र अद्याप त्यांना मंजूरी देण्यात आली नाही.
प्रोजेक्ट कुइपरअंतर्गत ॲमेझॉन भारतातील दोन मोठी शहरं मुंबई आणि चेन्नईमध्ये 10 ग्राउंड स्टेशन आणि दोन मोठे हब बनवण्याच्या तयारीत आहे. या सॅटेलाइट इंटरनेट सेवेचे उद्देश म्हणजे अशा भागांत सेवा सुरु करणं जिथे इंटरनेटची उपलब्धता खूपच कमी आहे किंवा अजिबात उपलब्ध नाही. म्हणजेच, गावे आणि दुर्गम भागात हाय-स्पीड इंटरनेट प्रदान करणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे.
प्रोजेक्ट कुइपरची सुरुवात 2019 मध्ये झाली होती. अमेझॉनला यूएस फेडरल कम्युनिकेशन्स कमिशन (FCC) कडून मान्यता मिळाली आहे, परंतु त्याअंतर्गत 2026 च्या मध्यापर्यंत अर्धे सॅटेलाइट्स सक्रिय करणे आवश्यक असेल. कंपनीची सुरुवात थोडी मंदावली आहे, त्यामुळे कंपनी ही अंतिम मुदत वाढवण्याची विनंती ती करू शकते असे मानले जाते.
प्रोजेक्ट कुइपर एलन मस्कच्या स्टारलिंकला टक्कर देणार आहे. दोन्ही सॅटेसाईट इंटरनेट सेवेचा उद्देश लो-ऑर्बिट सॅटेलाइट्सद्वारे ब्रॉडबँड इंटरनेट प्रदान करणं हा आहे. या प्रकल्पाद्वारे, Amazon AT&T आणि T-Mobile सारख्या जागतिक दूरसंचार कंपन्यांशी स्पर्धा करण्याची तयारी करत आहे.