सॉकेटमध्ये चार्जर लावूनच ठेवताय? होऊ शकतं फार मोठ नुकसान, तुम्ही विचारही केला नसेल.... लवकर सुधारा तुमची सवय
सध्याच्या काळात जगातील प्रत्येक व्यक्ती स्मार्टफोनचा वापर करतो. स्मार्टफोनचा वापर करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते चार्जर. असे अनेक लोकं आहेत जे स्मार्टफोन चार्ज करण्यासाठी सॉकेटमध्ये चार्जर लावतात, पण नंतर तो चार्जर सॉकेटमधून काढायचा विसरून जातात. त्यामुळे संपूर्ण दिवस चार्जर सॉकेटमध्येच असतो. असे देखील काही लोकं आहेत जे सॉकेटचे बटण देखील बंद करत नाहीत. काही लोकं आळसामुळे असं करतात तर घाई असल्यामुळे काहींच्या लक्षात राहत नाही. तुम्ही देखील असंच करता का?
चार्जर संपूर्ण दिवस सॉकेटमध्ये राहिला, तसेच बटण चालू असो किंवा बंद काय फरक पडतो, असाच विचार तुम्ही देखील करता का? तर तुम्ही चुकीचा विचार करत आहात. चार्जर सॉकेटमध्ये प्लग केल्याने आणि बटण चालू ठेवल्याने अनेक नुकसान होऊ शकतात. तुमच्या या सवयीमुळे तुमच्या चार्जरचे फार मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे तुमची ही सवय वेळीच बदलण अत्यंत आवश्यक आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
तज्ज्ञांनी असं सांगितलं आहे की, जर तुम्ही सॉकेटमध्ये चार्जर लावूनच ठेवला आणि बटण चालू असेल तर विजेचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. तुम्ही डिव्हाईस चार्जिंगला लावले आहे की नाही यामुळे काहीही फरक पडत नाही. जर तुमचा चार्जर सॉकेटमध्ये असेल आणि बटण चालू असेल तर विजेचा वापर केला जातो. हा विजेचा अपव्यय आहे. यालाच वँपायर पावर किंवा फँटम लोड असं देखील म्हटलं जाते. यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. जसे की विजेचा अपव्यय, विजेचे बिल वाढणे आणि विजेचा झटका लागणं.
अनेक चार्जर जास्त वोल्टचे असतात, असे चार्जर सॉकेटमध्ये लावून ठेवले आणि बटण चालू राहिले तर करंट लागण्याच धोका देखील असतो. याशिवाय चार्जर किंवा दुसरे डिव्हाईस सतत प्लग इन असल्याने ओव्हरहिट होऊ शकतात, यामुळे ब्लास्ट होण्याची देखील शक्यता असते. यामुळे केवळ चार्जरच नाही तर सॉकेटचं देखील नुकसान होऊ शकतं. या घटना टाळण्यासाठी चार्जरचा वापर करताना योग्य काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून, सॉकेटमध्ये चार्जर चालू ठेवण्याची तुमची सवय वेळीच बदला, अन्यथा अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. असे केल्याने तुम्ही वर्षभर भरपूर वीज वाचवू शकता. यामुळे तुमचा खर्च कमी होईल आणि तुमच्या खिशात जास्त पैसे वाचतील.
तुमचा चार्जर दिर्घकाळ चालावा असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. बरेच लोक बेडवर किंवा सोफ्यावर बसून केबल ओढून चार्जर काढण्याचा प्रयत्न करतात, पण असं करणं तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं. जोरात ओढल्यामुळे चार्जरची केबल तुटू शकते. म्हणून, नेहमी सॉकेटमधून अॅडॉप्टर हलक्या हाताने धरून काढा. चार्जर कधीही ओल्या किंवा पाण्याने भरलेल्या पृष्ठभागावर ठेवू नका, यामुळे चार्जर लवकर खराब होण्याची शक्यता असते. जर चार्जर ओला झाला तर वापरण्यापूर्वी तो पूर्णपणे वाळवा.