प्रचंड चर्चेत असणाऱ्या टेलिग्रामच्या बदनामीची कारणं माहीत आहे का? पेपर लीक, स्टॉक फसवणूक, खंडणी आणि बरंच काही (फोटो सैजनय - pinterest)
सोशल मिडीया अॅप टेलिग्राम युजर्समध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. व्हॉट्सॲपनंतर भारतात कोणतं मेसेजिंग ॲप लोकप्रिय असेल तर ते टेलिग्राम आहे. मात्र गेल्या दोन दिवसांपासून टेलिग्रामची प्रचंड बदनामी सुरु आहे. टेलिग्रामवर विविध आरोप लावले जात आहेत. एवढचं नाही तर भारतात टेलिग्राम बंद होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. याच कारण म्हणजे टेलिग्रामचा सीईओ Pavel Durov याला शनिवारी फ्रान्समध्ये अटक करण्यात आली आहे.
हेदेखील वाचा- टेलिग्राम सिईओ Pavel Durov ला म्हटलं जातं Russian Zuckerberg! जाणून घ्या त्याच्या रहस्यमय जीवनाविषयी
Pavel Durov त्याच्या खासगी जेटने प्रवास करत होता. तो बोर्जेट विमानतळावर पोहोचताच त्याला पोलिसांनी अटक केली. मॉडरेटरच्या कमतरतेमुळे मेसेजिंग ॲपवर गुन्हेगारी कृत्ये विनाअडथळा पुढे जाऊ शकतात. याच प्रकरणी कारवाई करत पोलिसांनी Pavel Durov याला फ्रान्समध्ये अटक केली. या कारवाईनंतर टेलिग्रामबाबत अनेक तर्क वितर्क सुरु झाले. टेलिग्रामच्या गुन्ह्यांबद्दल चौकशी सुरु झाली. या चौकशीवेळी टेलिग्राम अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचं समोर आलं. यामध्ये पेपर लीकपासून ते शेअर बाजारातील फेरफारपर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे. त्यामुळे टेलिग्राम सध्या अडचणीत सापडलं आहे.
सायबर तज्ञ आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी टेलीग्रामची तुलना डार्क वेबशी केली आहे. 24 ऑगस्ट रोजी टेलिग्रामचा सीईओ पावेल दुरोव याला फ्रान्समध्ये ताब्यात घेण्यात आल्याने भारतात चिंता वाढली. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे. आतापर्यंत या प्रकरणाच्या झालेल्या तपासात आढळलं आहे की, बेकायदेशीर व्यवहार, फसवणूक आणि अधिकाऱ्यांना माहिती प्रदान करण्यात अयशस्वी होण्याचे आरोप टेलिग्रामवर आहेत.
24 जुलै रोजी, सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने टेलीग्राम ॲपद्वारे चालू असलेल्या स्टॉकच्या किंमतीतील फेरफाराचा पर्दाफाश केला. एका टेलीग्राम समूहाच्या प्रशासकावर स्टील शीट उत्पादक कंपनीच्या शेअरच्या किंमतीत फेरफार करण्यासाठी 20 लाख रुपयांचे कमिशन घेतल्याचा आरोप होता.
हेदेखील वाचा- टेलिग्राम ॲपचे सीईओ Pavel Durov यांना फ्रान्समध्ये अटक; राजकीय दबाव की आणखी काही? काय आहे कारण
3 मे रोजी भोपाळमधील दोघांना स्थानिक डॉक्टरांची 38 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. टेलिग्रामचा वापर करून, या दोघांनी पोलीस अधिकारी म्हणून ओळख दिली आणि बनावट चौकशी केली. त्यानंतर अंदाजे 9,00,000 अर्जदारांसह UGC-NET परीक्षा 19 जून 2023 रोजी आयोजित केल्यानंतर दुसऱ्या दिवशी रद्द करण्यात आली. टेलिग्रामवर प्रश्नपत्रिका फुटल्याने पेपर रद्द करण्यात आला. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले, “आम्ही टेलिग्रामवरील प्रश्नांची तुलना मूळ UGC-NET प्रश्नांशी केली आणि ते जुळले.” 3 मे 2023 रोजी, अनेक NEET-UG अर्जदारांना परीक्षेच्या अगोदर टेलिग्रामवर परीक्षेच्या प्रश्नांच्या प्रती मिळाल्या, ज्यामुळे भारतातील सर्वात मोठ्या परीक्षा विवादांपैकी एक निर्माण झाला.
या सर्व आरोपांच्या प्रत्युत्तरात टेलिग्रामने सांगितलं आहे की, ‘प्लॅटफॉर्मच्या गैरवापरासाठी प्लॅटफॉर्म किंवा त्याच्या मालकाला जबाबदार धरले जावे असे सुचवणे मूर्खपणाचे आहे.’ भारत सरकारने अद्याप टेलिग्रामविरुद्ध कोणतीही मोठी कारवाई जाहीरपणे जाहीर केलेली नाही. मात्र, या प्लॅटफॉर्मवरून होत असलेल्या बेकायदेशीर कामांमुळे कडक नियम आणि देखरेखीची मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे सरकार आता काय निर्णय घेणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.