नवीन स्मार्टफोन खरेदी करताय? चार्जरनंतर आता बॉक्समधून गायब होणार ही एक्सेसरी, 'या' कंपनीने सुरु केला धक्कादायक ट्रेंड
गेल्या काही वर्षांपासून नवीन स्मार्टफोनसह बॉक्समध्ये चार्जर मिळणं बंद झालं आहे. स्मार्टफोनमध्ये चार्जर मिळणं बंद झाल्यानंतर युजर्सनी नाराजी व्यक्त केली होती. चार्जरनंतर आता USB केबलची वेळ आली आहे. मोबाईल फोन तयार करणाऱ्या कंपन्यांनी आता नव्या स्मार्टफोनसोबत USB केबल देणं बंद केलं आहे. वाढता ई-कचरा आणि खर्च कमी ठेवणे, ही कंपन्यांच्या निर्णयांची प्रमुख कारणं आहेत. याचा अर्थ असा आहे की, आता ग्राहकांना स्मार्टफोन खरेदी करताना बॉक्समध्ये USB केबल दिली जाणार नाही. त्यामुळे त्यांना USB केबलसाठी अतिरिक्त पैसे द्यावे लागणार आहेत. याशिवाय सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्राहकांना चांगल्या दर्जाची केबल खरेदी करावी लागणार आहे, ज्यामुळे त्यांना दिर्घकाळापर्यंत त्याचा वापर करता येणार आहे.
नव्या स्मार्टफोनच्या बॉक्समधून USB केबल हटवण्याची सुरुवात टेक कंपनी सोनी ने केली आहे. कंपनीने त्यांच्या नवीन स्मार्टफोन Sony Xperia 10 VII सह बॉक्समध्ये चार्जिंग केबल दिली नाही. म्हणजेच या स्मार्टफोनच्या बॉक्समध्ये ना चार्जर आहे, आणि ना USB केबल. त्यामुळे ग्राहकांना USB केबल आणि चार्जर खरेदी करण्यासाठी अतिरिक्त पैसे खर्च करावे लागणार आहेत. खरं तर स्मार्टफोन जगात सोनी फारसं मोठं नाव नसलं तरी देखील कंपनीने आता या ट्रेंडची सुरुवात केली आहे. त्यामुळे लवकरच इतर टेक कंपन्या देखील हे पाऊल उचलू शकतात. सोनीप्रमाणे, अॅपलनेही त्यांच्या नवीन एअरपॉड्सना केबल देणे बंद केले आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
विवो, ओप्पो, रेडमी, रिअलमी, वनप्लस या जगभरातील सर्वात मोठ्या स्मार्टफोन कंपन्यांपैकी एक आहेत. त्यांची युजर्सची संख्या देखील प्रचंड आहे. त्यामुळे जर या कंपन्यांनी हा निर्णय घेतला आणि स्मार्टफोन बॉक्समध्ये चार्जर आणि USB केबल देणं बंद केलं तर मोठा गोंधळ निर्माण होऊ शकतो. कारण युजर्सना स्मार्टफोन खरेदी करताना चार्जर आणि USB केबलसाठी अतिरिक्त पैसे खर्च करावे लागू शकतात. मात्र अद्याप या स्मार्टफोन कंपन्यांनी अशी कोणतीही घोषणा केली नाही.
काही स्मार्टफोन कंपन्यांनी बॉक्समध्ये चार्जर आणि USB केबल देणं बंद केलं आहे. पर्यावरणाचं होणारं नुकसान हे यामागील कारण असल्याचं सांगितलं जात आहे. खरं तर अनेक ग्राहकांकडे एकापेक्षा अधिक USB-C केबल असतात. अशा परिस्थितीत त्यांना नवीन केबलची गरज नसते. अशा प्रकारे एक्स्ट्रा केबलने ई-वेस्ट वाढण्याचा धोका कमी होतो. चार्जर आणि केबल नसल्यामुळे फोनचे बॉक्स देखील छोटे असतील आणि यामुळे एकाच वेळी जास्त बॉक्स ट्रांसपोर्ट केले जाऊ शकतात, ज्यामुळे वाहतुकीदरम्यान होणारे प्रदूषण कमी होते.
तसेच दुसरं कारण खर्चाशी संंबंधित आहे. USB केबल न दिल्याने कंपन्यांना मोठा फायदा होऊ शकतो. चार्जर आणि USB केबल देणं बंद केल्यास कंपन्यांचा खर्च देखील कमी होणार आहे. तसेच, ग्राहक दीर्घकालीन वापरासाठी स्वतंत्रपणे मूळ केबल्स खरेदी करतील, त्यामुळे कंपन्यांचा अधिक फायदा होऊ शकतो.