Snapchat ने युजर्सना दिला धोका! फ्रीमध्ये नाही दिसणार यूजर्सचं फेव्हरेट फीचर, जुने फोटो - व्हिडीओ पाहण्यासाठी द्यावे लागणार पैसे
स्नॅपचॅट हे एक लोकप्रिय ॲप आहे. स्नॅपचॅटवर फोटो क्लिक करण्यासाठी वेगवेगळे फिल्टर्स दिलेले आहेत. या फिल्टर्सने लोकांना खरंच वेड लावलं आहे. कारण या फिल्टरच्या मदतीने लोकं वेगवेगळ्या लूकमध्ये फोटो क्लिक करू शकतात. जसे की ब्लॅक अँड व्हाईट फोटो किंवा विदाऊट मेकअप लूक. असे वेगवेगळे फिल्टर स्नॅपचॅटमध्ये उपलब्ध आहेत. याशिवाय आपण रोज आपल्या मित्रांसोबत स्नॅप देखील शेअर करू शकतो आणि स्ट्रीक तयार करू शकतो. आपले लोकेशन आपल्या मित्रांसोबत शेअर करू शकतो. या फीचर्समुळे हे एक लोकप्रिय अॅप बनले आहे आणि याच ॲपमधील एक सर्वांचा आवडते फीचर म्हणजे मेमरीज.
मेमरीजमध्ये युजर्सना त्याच दिवशी क्लिक केलेले 1 वर्षापूर्वीचे, 2 वर्षांपूर्वीचे असे फोटो आणि व्हिडीओ दिसतात. आतापर्यंत हे फीचर युजर्ससाठी मोफत उपलब्ध होते. मात्र आता स्नॅपचॅट युजर्स त्यांचं आवडतं फीचर फ्रीमध्ये वापरू शकणार नाहीत. कंपनीने घोषणा केली आहे की, ॲप आता जुने फोटो आणि व्हिडीओ स्टोअर करण्यासाठी पैसे घेणार आहे. 2016 मध्ये लाँच करण्यात आल्यापासून हे फीचर युजर्ससाठी मोफत उपलब्ध होते. मात्र आता असं होणार नाही. कंपनीच्या या घोषणेवर युजर्स खूश नाहीत आणि ते हा निर्णय मागे घेण्याची मागणी करत आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
नवीन पॉलिसीअंतर्गत कंपनी 5GB हून अधिक स्टोरेज झाल्यास यूजर्सकडून पैसे घेणार आहे. कंपनीने जारी केलेल्या ब्लॉगमध्ये सांगितलं आहे की, ही पॉलिसी हळूहळू सर्व युजर्ससाठी लागू केली जाणार आहे. कंपनीच्या एका प्रवक्त्याने सांगितलं की, 100GB वाल्या प्लॅनसाठी 1.99 अमेरिकी डॉलर म्हणजेच सुमारे 177 रुपये प्रति महिना द्यावे लागणार आहेत. तर 250GB वाल्या प्लॅनसाठी 3.99 डॉलर म्हणजेच सुमारे 355 रुपये खर्च करून Snapchat+ सब्सक्रिप्शन खरेदी करावे लागणार आहे. स्नॅपचॅटचे सध्या 90 कोटींहून अधिक मंथली एक्टिव यूजर्स आहेत आणि कंपनीचे म्हणणे आहे की त्यापैकी बहुतेकांकडे 5 जीबीपेक्षा कमी मेमरीज स्टोरेज आहे. नवीन निर्णयाचा त्यांच्यावर कोणताही परिणाम होणार नाही.
ज्या यूजर्सचे मेमोरीज स्टोरेज 5GB हून अधिक आहे, त्यांना एका वर्षापर्यंत टेंपरेरी स्टोरेज मिळणार आहे आणि त्यांच्याकडे त्यांची सेव्ह केलेला कंटेट डाउनलोड करण्याचा पर्याय असेल. एका वर्षानंतर त्यांना स्टोरेज प्लॅन खरेदी करावा लागणार आहे. स्नॅपचॅट लाँच होऊन जवळजवळ एक दशक झाले आहे आणि आतापर्यंत त्यावर एक ट्रिलियनपेक्षा जास्त आठवणी जतन केल्या गेल्या आहेत.