WhatsApp Update: मेसेजिंग अॅपवर चॅटिंग करणं झालं आणखी मजेदार, कंपनी घेऊन आलीये जबरदस्त फीचर
WhatsApp त्यांच्या करोडो युजर्ससाठी पुन्हा एकदा एक नवीन फीचर घेऊन आली आहे. या फीचरमुळे आता युजर्सना चॅट करताना आणखी मजा येणार आहे. या फीचरच्या मदतीने आता युजर्स चॅटमधील मेसेज अगदी सहज दुसऱ्या भाषेत ट्रांसलेट करू शकणार आहेत. या फीचरच्या मदतीने वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्यांच्या चॅटिंगमध्ये कोणताही अडथळा येणार नाही.
या अपडेटनंतर जर तुम्हाला एखाद्या अनोळखी भाषेत मेसेज आला तर तुम्ही हा मेसेज तुमच्या भाषेत ट्रांसलेट करू शकणार आहात. यासाठी तुम्हाला त्या मेसेजवर लॉन्ग-प्रेस करावं लागणार आहे, यानंतर तुम्हाला ट्रांसलेटचा ऑप्शन दिसेल. यानंतर तुम्हाला मेसेज ज्या भाषेत ट्रांसलेट करायचा आहे, ती भाषा निवडा. ट्रांसलेट मेसेज देखील सेव्ह केले जाऊ शकतात, त्यामुळे तुम्हाला ते वारंवार भाषांतरित करावे लागणार नाही. हे वैशिष्ट्य केवळ वैयक्तिक चॅटमध्येच नाही तर ग्रुप चॅट आणि चॅनेल अपडेटमध्ये देखील काम करेल. त्यामुळे आता युजर्स कोणत्याही भाषेतील लोकांसोबत संवाद साधू शकणार आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
एवढंच नाही तर कंपनी या फीचरमध्ये आणखी एक अपडेट देखील जोडणार आहे. हे अपडेट अँड्रॉईड यूजर्ससाठी असणार आहे. अँड्रॉयड यूजर्स कोणत्याही संपूर्ण चॅटसाठी ऑटोमॅटिक ट्रांसलेशनवाले ऑप्शन देखील चालू करू शकतात. सोप्या शब्दांत सांगायचे तर, त्या चॅटमध्ये येणारे सर्व नवीन मेसेज आपोआप निवडलेल्या भाषेत ट्रांसलेट केले जातील.
कंपनीने या फीचरची घोषणा केल्यानंतर अनेक युजर्सनी सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. अनेकांना वाटत आहे की त्यांचे मेसेज सर्वरला पाठवले जाऊ शकतात. मात्र असं काही होणार नाही. कंपनीने स्पष्टपणे सांगितले आहे की सर्व ट्रांसलेशन थेट डिव्हाइसवर होतील. याचा अर्थ असा की WhatsApp ला तुमच्या मेसेज कंटेंटमध्ये प्रवेश राहणार नाही. फीचर चालू असतानाही तुमची गोपनीयता पूर्णपणे अबाधित राहील.
अलीकडेच समोर आलेल्या अहवालानुसार, कंपनी अँड्रॉईड युजर्ससाठी एक नवीन फीचर घेऊन येणार आहे. हे फीचर ग्रुप चॅटसाठी असणार आहे. म्हणजेच आता युजर्स ग्रुपमधील चॅट कंट्रोल करू शकणार आहे. अहवालानुसार, कंपनी लवकरच यूजर्सना ग्रुप चॅटमध्ये ‘एवरीवन’ (प्रत्येकजण) उल्लेख म्यूट करण्याची परवानगी देईल. त्यामुळे तुम्हाला वारंवार ग्रुप नोटिफिकेशन येणार नाही. सध्या या फीचरची चाचणी सुरु आहे.
WhatsApp फीचर ट्रॅकर WABetaInfo ने सांगितलं आहे की, Android साठी WhatsApp बीटा वर्जन 2.25.27.1 मध्ये हे नवीन अपडेट पाहायला मिळालं आहे. इथे युजर्स सर्वांना मेंशन करून म्यूट करू शकणार आहेत. असेही म्हटले जात आहे की कंपनी लवकरच हे फीचर लाँच करू शकते.