Women’s Day 2025: Google ने केला स्त्रीशक्तीचा गौरव, खास अंदाजात दिल्या महिला दिनाच्या शुभेच्छा! स्पेशल डूडल केलं शेअर
गुगल डूडलने आज 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला. स्त्रीशक्तीचा गौरव करण्यासाठी गुगलने एक खास डूडल शेअर केला आहे. ज्याद्वारे त्याने सर्व महिलांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गुगल डूडल ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की, “या डूडलद्वारे, आम्ही विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) क्षेत्रात क्रांतिकारी योगदान देणाऱ्या महिलांचा सन्मान करतो.”
भारतात YouTube ने हटवले 29 लाख व्हिडिओ, बंद केले 48 लाख चॅनेल्स; या कारणांमुळे घेतला निर्णय
गुगलने सांगितलं आहे की, डूडलच्या माध्यमातून सर्व महिलांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. प्रथम 1975 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी जगभरातील महिलांच्या महत्त्वपूर्ण योगदानाची दखल घेत आंतरराष्ट्रीय महिला दिनासाठी अधिकृतपणे मान्यता दिली होती. (फोटो सौजन्य – Pinterest)
आंतरराष्ट्रीय महिला दिन आपल्याला इतिहासात महिलांनी बजावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेची आणि आधुनिक काळातील प्रगती आणि नवोपक्रमाचा आधार म्हणून त्यांचे योगदान कसे आहे याची आठवण करून देतो. या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाची थीम “अॅक्सिलरेट अॅक्शन” आहे, ज्याचा उद्देश महिलांच्या प्रगतीसाठी अधिक प्रभावीपणे धोरणे, संसाधने आणि सकारात्मक कृती ओळखणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे आहे.
गुगलने शेअर केलेल्या डूडलमध्ये अंतराळ संशोधन, पुरातत्वशास्त्र आणि प्रयोगशाळेतील संशोधनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या महिलांना अधोरेखित केले आहे. या महिलांच्या कामगिरीमुळे विज्ञानाच्या जगाला एक नवीन दिशा मिळाली आहे. महिलांचा सहभाग असूनही, STEM क्षेत्रात अजूनही लिंगभेद कायम आहे हे देखील या डूडलने अधोरेखित केले आहे. आजपर्यंत, जगभरातील STEM कर्मचाऱ्यांपैकी फक्त 29% महिला आहेत, परंतु ही संख्या दरवर्षी वाढत आहे. हाच बदल सर्वापर्यंत पोहोचावा, या उद्दशाने गुगलने एक खास डूडल शेअर केलं आहे.
गुगलने आपल्या खास डूडलद्वारे विज्ञान आणि संशोधन क्षेत्रात क्रांतिकारी योगदान देणाऱ्या महिलांच्या कामगिरीचा सन्मान केला आहे. हे डूडल अशा महिलांच्या कामगिरीवर प्रकाश टाकते ज्यांनी अंतराळ संशोधनाला नवीन उंचीवर नेले, प्राचीन शोध सर्वांपर्यंत पोहोचवले आणि प्रयोगशाळेतील संशोधनात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या योगदानामुळे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या क्षेत्रात नवीन समज निर्माण झाली आणि विज्ञानाच्या जगात मोठा बदल घडून आला.
गुगल डूडल हे एक प्रकारचे कलात्मक सादरीकरण आहे जे गुगल त्यांच्या होमपेजवर विविध महत्त्वाचे प्रसंग, उत्सव, ऐतिहासिक घटना आणि प्रसिद्ध व्यक्तींच्या कामगिरीचा सन्मान करण्यासाठी प्रदर्शित करते. हे डूडल केवळ माहितीच देत नाहीत तर युजर्सना परस्परसंवादी अनुभव देखील देतात.
जगभरातील महिलांनी विविध क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी 1975 मध्ये पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याची घोषणा केली. तेव्हापासून, या वार्षिक कार्यक्रमाने जगभरातील महिलांच्या सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक आणि आर्थिक कामगिरीची ओळख पटवून दिली आहे. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश लिंगभेद आणि असमानता दूर करणे आणि समानतेच्या दिशेने प्रयत्नांना प्रोत्साहन देणे आहे.