Youth Digital Wellbeing Initiative: लहान मुलांसाठी आता अधिक सुरक्षित होणार YouTube, क्वालिटी कंटेटवर करणार फोकस
व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म YouTube चा वापर अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वचजण करतात. YouTube वर प्रत्येक वयोगटातील लोकांसाठी एक वेगळा कंटेट अपलोड करण्यात आलेला असतो. पण अनेकदा असं होतं की, मोठ्या लोकांसाठी अपलोड करण्यात आलेले व्हिडीओ लहान मुलं देखील बघतात आणि त्यांच्या मनावर परिणाम होतो. याच सर्व गोष्टींचा विचार करता YouTube ने एक प्रोग्राम सुरु केला आहे.
लहान मुलांना सुरक्षित आणि दर्जेदार कंटेट प्रदान करण्यासाठी YouTube ने Youth Digital Wellbeing Initiative सुरू केले आहे. YouTube च्या या उपक्रमात 10 देशांमधील 12 हून अधिक लोकप्रिय कंटेंट क्रिएटर्स आणि डिस्ट्रीब्यूटर्स सामील झाले आहेत. या प्रोग्रामद्वारे, YouTube मुलांना एक चांगला आणि सुरक्षित ऑनलाइन अनुभव देण्यावर काम करत आहे. लहान मुलांचे हानिकारक कंटेटपासून संरक्षण व्हावे आणि त्यांना कोणत्याही प्रकारचा मानसिक त्रास होऊ नये, या उद्देशाने हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
YouTube नेहमीच मुलांच्या डिजिटल सुरक्षेबद्दल चिंतित राहिले आहे. युट्यूबवरील व्हिडीओंमुळे लहान मुलांचे कोणत्याही प्रकारे नुकसान होऊ नये आणि त्यांची सुरक्षा कायम राहावी, यासाठी कंपनी नेहमीच प्रयत्न करत असते. युथ डिजिटल वेलबीइंग इनिशिएटिव्हद्वारे, YouTube त्यांच्या प्लॅटफॉर्मवर दर्जेदार कंटेट वाढवून मुलांना हानिकारक सामग्रीपासून दूर ठेवू इच्छिते. YouTube ने यासाठी आधीच अनेक प्रयत्न केले आहेत. ज्यामध्ये YouTube Kids, Supervised Experiences आणि American Psychological Association यांचा समावेश आहे.
YouTube Kids – मुलांसाठी एक सुरक्षित आणि परस्परसंवादी सामग्री प्लॅटफॉर्म.
Supervised Experiences – पालकांना त्यांच्या मुलांच्या ऑनलाइन क्रियाकलापांचे निरीक्षण करण्यासाठी हेल्पफुल टूल.
American Psychological Association सह पार्टनरशिपमध्ये YouTube ने ऑनलाइन टाइम मॅनेजमेंट गाइड तयार केले आहे.
युथ डिजिटल वेलबीइंग इनिशिएटिव्हचा भाग म्हणून YouTube ने जगभरातील लोकप्रिय कंटेंट क्रिएटर्स आणि डिस्ट्रीब्यूटर्ससोबत भागीदारी केली आहे. स्थानिक सामग्री डेवलपमेंट आणि डिस्ट्रीब्यूशनमुळे मुलांसाठी प्लॅटफॉर्म अधिक सुरक्षित होऊ शकतो असे YouTube चं म्हणणे आहे.
या उपक्रमाद्वारे, YouTube मुलांच्या सुरक्षिततेसाठी आणि डिजिटल सुरक्षेसाठी अनेक पावले उचलत आहे. कंपनी मुलांच्या वयानुसार आणि त्यांच्या गरजांनुसार तयार केलेला कंटेट विकसित करेल. यासोबतच, 18+ आणि यासंबंधित कंटेंट आणि हिंसक दृश्ये डीफॉल्ट सेटिंग्जमध्ये मर्यादित असतील. यासोबतच, ते पालकांसाठी मीडिया लिटरेसीसाठी देखील काम करेल.
YouTube मुलांसाठी दर्जेदार कंटेटचा प्रचार करेल. यामुळे शैक्षणिक, मनोरंजक आणि सुरक्षित कंटेंटला चांगले रँकिंग देऊन निरोगी स्क्रीन टाइमला प्रोत्साहन मिळेल. यासोबतच, ते तरुण युजर्ससाठी संवेदनशील आणि हानिकारक सामग्री मर्यादित करेल.
या भागीदारीसाठी, YouTube ने ChuChu TV, Khan Academy, Moonbug, The Pinkfong Company, WildBrain, Miraculous Corp, TV Cultura आणि The Wiggles सारख्या लोकप्रिय कंटेंट निर्मात्यांशी भागीदारी केली आहे.