Sharad Pawar News: देशाच्या अर्थव्यवस्थेवर..; पंतप्रधान मोदींच्या त्या आवाहनानंतर शरद पवारांचे सूचक विधान
Sharad Pawar Reply PM Modi Appeal: मध्य पूर्वेतील सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच भारतीयांना वर्षभर सोने खरेदी न करण्याचे आणि पेट्रोल, डिझेल व खाद्यतेलाचा वापर शक्य तितका कमी करण्याचे आवाहन केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आता यावर प्रतिक्रिया दिली आहे. या घोषणांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे.
शरद पवार यांनी ‘एक्स’वर पोस्ट करून पंतप्रधान मोदींच्या आवाहनावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले, “मध्यपूर्वेतील अस्थिर आणि युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी (
@narendramodi) यांनी दोन दिवसांपूर्वी काही घोषणा केल्या. त्यांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. या घोषणा अचानक करण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिक, उद्योग-व्यवसाय क्षेत्र तसेच गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ही बाब निश्चितच काळजी निर्माण करणारी आहे.
या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रधानमंत्र्यांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक आयोजित करावी. राष्ट्रीय हिताच्या प्रश्नांवर सर्व पक्षीय नेत्यांना विश्वासात घेऊन निर्णय-प्रक्रिया राबविणे देशहितासाठी अत्यंत आवश्यक आहे.
सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती लक्षात घेता केंद्र सरकारने अधिक संवेदनशीलता आणि व्यापक सल्लामसलत यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. यासोबतच प्रधानमंत्र्यांनी देशातील नामवंत अर्थतज्ज्ञ, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि संबंधित तज्ज्ञांची तातडीने बैठक बोलावून परिस्थितीचा सखोल आढावा घ्यावा. पुढील धोरणांबाबत व्यापक विचारविनिमय करावा. देशातील जनतेमध्ये विश्वास आणि स्थैर्य निर्माण करणे, यालाच सद्यस्थितीत सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे, अशी आमची ठाम भूमिका आहे.
शरद पवार यांनी काही मोदी सरकारला काही सल्लेही दिले आहेत. परिस्थितीचे गांभीर्य पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक बोलवावी. राष्ट्राच्या कल्याणासाठी राष्ट्रीय हिताच्या बाबींवरील निर्णय प्रक्रियेत सर्व पक्षांच्या नेत्यांचा समावेश करणे महत्त्वाचे आहे. शरद पवार यांनी मोदी सरकारला राष्ट्रीय तज्ज्ञांशी संवाद साधण्याचे आवाहन केले.
तसेच, सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती पाहता केंद्र सरकारने अधिक संवेदनशीलता आणि व्यापक विचारविनिमयाला प्राधान्य दिले पाहिजे. याशिवाय, पंतप्रधानांनी परिस्थितीचा सखोल आढावा घेण्यासाठी देशातील नामवंत आर्थिक तज्ज्ञ, उद्योग प्रतिनिधी आणि संबंधित तज्ज्ञांसोबत तातडीने बैठक बोलवावी. भविष्यातील धोरणांवर सर्वसमावेशक चर्चा झाली पाहिजे. तसेच, या गंभीर परिस्थितीत जनतेमध्ये विश्वास आणि स्थिरता निर्माण करणे हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे.






