(फोटो सौजन्य: X)
एखाद्याचा मृत्यू हा त्याच्या कुटुंबासाठी किंवा त्यांच्या जिवलगांसाठी दुःखाची बाब असते. आपल्या जवळचा व्यक्ती जगात नाही हा विचारही कुणाच्याही डोळ्यात अश्रू अनावर करतो. हिंदू धर्मानुसार, कोणत्याही व्यक्तीचे निधन झाले की त्याचे कुटुंबीय अंत्यसंस्कार विधी पार पडतात ज्यात व्यक्तीच्या जवळच्या सर्व लोकांची हजेरी भरते. लोक येतात, व्यक्तीच्या जाण्याचे दुःख व्यक्त करतात आणि एकमेकांना आधार देतात. पण सध्या इंटरनेटवर एक अनोखा अंत्यविधी चर्चेत ठरला आहे ज्यात एका माणसाने जिवंतपणीच स्वतःची अंत्ययात्रा काढल्याची बातमी समोर आली आहे.
सदर घटना बिहारच्या गया जिल्ह्यातून समोर आली असून माणसाने स्वतःसाठी बनावट अंत्यसंस्कार केल्याची बाब उघडकीस आली आहे. व्यक्तीने दावा केला की, जिवंतपणीच स्वतःची अंत्ययात्रा काढण्याचे कारण म्हणजे त्याला पाहायचं होत की, त्याच्या मृत्यूनंतर किती लोक त्याच्या अंत्ययात्रेत सामील होतील आणि त्याची आठवण काढत रडतील… वृत्तानुसार, ही घटना गया जिल्ह्यातील गुरारू ब्लॉकमधील कोंची गावात घडली.
माजी हवाई दलाचे सैनिक मोहन लाल यांनी हा पराक्रम केला आहे, त्यांचे वय ७४ वर्ष आहे. त्यांनी काही लोकांना त्यांना सजवलेल्या पार्थिवावर सर्व विधींसह स्मशानभूमीत घेऊन जाण्यास सांगितले, यावेळी बॅग्राऊंडमध्ये काही भावनिक गाणी देखील वाजत होती. आश्चर्यची बाब म्हणजे या अंत्ययात्रेत शेकडो गावकरी सामील झाले ज्यांना या खोटेपणाची चाहूलही लागली नाही, जेव्हा ते आले तेव्हा मोहन लाल उभे राहिले आणि सर्वांना धक्का बसला. मोहन लाल म्हणाले की त्यांना त्यांच्या अंत्यसंस्कारात कोण सहभागी होईल हे पहायचे होते. “मृत्यूनंतर लोक पार्थिव वाहून नेतात, पण मला ते स्वतः पहायचे होते आणि लोकांनी मला किती आदर आणि प्रेम दिले हे जाणून घ्यायचे होते,” असे ते म्हणाले.
Bihar Air Force Veteran Holds His Own Funeral to See How People Would Honour Him
-74-year-old Mohan Lal staged his own funeral in Gaya, lying on a bier in a white shroud.
-Villagers joined, chanting “Ram Naam Satya Hai.”
-A symbolic effigy was cremated, followed by a community… pic.twitter.com/AwotDxoZor — Sapna Madan (@sapnamadan) October 14, 2025
माहितीनुसार, मोहन लाल यांच्या पत्नी जीवन ज्योती यांचे १४ वर्षांपूर्वी निधन झाले. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. एक सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. पावसाळ्यात अंत्यसंस्कार करताना येणाऱ्या अडचणी ओळखून त्यांनी अलिकडेच स्वखर्चाने गावात एक सुसज्ज स्मशानभूमी बांधली. त्यांच्या या खोट्या अंत्ययात्रेचे फोटोज आणि व्हिडिओज आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. अनेकांनी याला विनोद मानले आहे तर काहींनी याला स्वतःकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न असे म्हटले आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.