माझ्या बापाची EVM! भाजपनेत्याच्या मुलाचे मतदानकेंद्रातून लाईव्ह, कॉंग्रेसकडून व्हिडिओ जारी

भाजप नेत्याच्या मुलाचा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे. यामध्ये नेत्याचा मुलगा EVM मशीन माझ्या बापाची असल्याचा धक्कादायक दावा करत आहे.

    गांधीनगर : देशभरामध्ये लोकसभा निवडणूकीचे वार वाहत आहेत. मतदानाचे तीन टप्पे देखील पार पडले आहेत. मात्र अनेकांनी EVM मशीनचे फोटो आणि मतदान करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. निदर्शनास आलेल्या अनेकांवर निवडणूक आयोगाने कारवाईचा बडगा उगारला आहे. मात्र कॉंग्रेसकडून भाजप नेत्याच्या मुलाचा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे. यामध्ये नेत्याचा मुलगा EVM मशीन माझ्या बापाची असल्याचा धक्कादायक दावा करत आहे.

    कॉंग्रेसकडून शेअर करण्यात आलेला व्हिडिओ गुजरातमधील दाहोज मतदारसंघातील आहे. भाजप नेत्याच्या मुलाने मतकेंद्रामध्ये जाऊन इन्स्टाग्राम लाईव्ह केल्याचे दिसून आले आहे. त्याचप्रमाणे इतर मतदारांच्या वतीने त्यानेच मतदान केल्याचा आरोप देखील केला जात आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकरी रोष व्यक्त करत आहेत. कॉंग्रेस नेत्यांनी देखील व्हिडिओ शेअर करत निवडणूक आयोगाकडे कारवाईची मागणी केली आहे. पोलीसांनी व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित तरुणाला ताब्यात घेत कारवाई केली आहे.

    जिल्हा निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी नेहा कुमारी यांनी या प्रकरणाबद्दल अधिकची माहिती दिली आहे. आरोपी तरुणाने सोशल मीडियाचा वापर करत मतदान करताना EVM मशीनसोबत लाईव्ह व्हिडिओ केला. यामुळे निवडणूकीतील गोपनियतेचा भंग झाला आहे. व्हायरल व्हिडिओ हा माहिसागर जिल्ह्यातील संतरापूर विधानसभा मतदारसंघातील आहे. मतदान करत लाईव्ह केलेल्या व्यक्तीचे नाव विजय भाभोर असे असून त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे.