(फोटो सौजन्य: Instagram)
दिवाळीच्या सणाची सर्वत्र रंगत पसरल्याचे दिसून येते. नवीन कपडे परीधान करुन, दिवे लावून, फटाते फोडून लोक या सणाचा आनंद साजरा करतात. अनेकदा आपल्याला लहाना वाटणाऱ्या गोष्टी वयोवृद्धाना मोठा आनंद देऊन जातात. दिवाळीच्या या दिवसांत एक गोड व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे ज्यात एक सुनबाई आपल्या सासऱ्यांना चिमट्याच्या मदतीने लवंगी फटाका कसा फोडायचा ते शिकवताना दिसून आली. आता फटाके फोडणे ही आपल्यासाठी एक सामान्य गोष्ट असली तर इतक्या वर्षांनंतर फटाक्यांचा आनंद लुटताना आजोबा भारीच खुशीत दिसून आले. त्यांचा हा आनंद चेहऱ्यावर असा झळकत होता की पाहून सर्वांच्याच गाली स्मितहास्य उमटलं. हे गोड क्षण आपल्या फोनच्या कॅमेरात कैद करुन सुनेने याचा व्हिडिओ इंटरनेटवर शेअर केला आणि काही क्षणातच लोकांनी यावर आपली पसंती दर्शवली.
काय घडलं व्हिडिओत ?
इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, महिला मोठ्या विनम्रतेने आपल्या सासऱ्यांना चिमटा हातात पकडून फटाका कसा फोडायचा याचे प्रशिक्षण देताना दिसून येते. व्हिडिओत समोर एका टेबलावर मेणबत्ती पेटवून ठेवल्याचे दिसून येते. महिला सासऱ्यांचा हात पकडून त्यांच्या हातात चिमटा देते, यात फटाका पकडते आणि मेणबत्तीजवळ नेऊन फटाक्याला पेटवते. फटाका पेटताच ती त्याला गॅलरीबाहेर फेकते, ज्यानंतर जोरदार आवाज होतो आणि हा फटाका हवेत फुटतो. फटाक्याचा धमाकेदारपणे स्फोट पाहून आजोबांच्या चेहऱ्यावर हसू उमलत आणि नंतर ते स्वतःच्या हाताने फटाके फोडून त्यांची मजा लुटू लागतात. छोट्या गोष्टीतही आजोबांना झालेला आनंद पाहून सर्वच सुखावतात आणि वेगाने व्हिडिओला शेअर करु लागतात.
हा व्हायरल व्हिडिओ @aarti_vlogs_etah_24 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “त्या बाईला सलाम. जिने त्यांना आनंद दिला, आशीर्वादित राहा ” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आजोबांचा आनंद तर पाहा” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “दिवाळीतील सर्वात सुंदर रील”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






