(फोटो सौजन्य: Instagram)
आज अनंत चतुर्दशी, गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस. गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी रस्ते भक्तांनी गजबजले आहेत. “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!” अशा गजरात भक्तगण आपले लाडके बाप्पा निरोप घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. अशा भावपूर्ण वातावरणात एक विशेष व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. हा व्हिडिओ AI तंत्रज्ञानाच्या मदतीने बनवलेला बाप्पाचा एक पौराणिक व्हिडीओ आहे. चला यात काय दिसलं त्याविषयी सविस्तरपणे जाणून घेऊया.
काय दिसलं व्हिडीओत?
हा व्हिडिओ @animaginate.ai या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला असून यात गणपती बाप्पा महर्षी व्यासांसोबत महाभारत लिहिताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ केवळ कलात्मकच नाही, तर तो पौराणिक कथांवर आधारित गूढतेला स्पर्श करणारा आहे. पौराणिक मान्यतेनुसार, महाभारत हा ग्रंथ अनंत चतुर्दशीच्या दिवशी पूर्ण झाला होता, आणि हाच संदर्भ या व्हिडीओमागे आहे.
कथेप्रमाणे, महर्षी व्यासांनी महाभारताची रचना केली, पण त्यांना ती लेखबद्ध करण्यासाठी एका बुद्धिमान आणि वेगवान लेखकाची गरज होती. त्यांनी ही जबाबदारी गणपती बाप्पाकडे दिली. मात्र गणपती बाप्पांनी एक अट ठेवली, “लेखन सुरू झाल्यानंतर व्यासांनी कुठेही थांबायचे नाहीत.” ही अट व्यासांनी स्वीकारली आणि पुढील १० दिवसांच्या अथक प्रयत्नातून महाभारताची लेखन प्रक्रिया पूर्ण झाली. यातील शेवटचा आणि महत्त्वाचा दिवस होता अनंत चतुर्दशी.
AI तंत्रज्ञानाच्या मदतीने ही संपूर्ण कल्पना अत्यंत जिवंतपणे व्हिडीओच्या माध्यमातून उभी करण्यात आली आहे. व्हिडीओमध्ये बाप्पाचा तेजस्वी रूप, व्यासांचा गंभीर भाव, आणि दोघांमधील कामाचं तादात्म्य यांचं अत्यंत सुंदर चित्रण केलं आहे. या व्हिडीओला आतापर्यंत १ लाख ३२ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. नेटकऱ्यांनी यावर भरभरून प्रतिक्रिया दिल्या असून, बाप्पाच्या या नवीन रूपाचं कौतुक केलं आहे. अनेकांनी हे दृश्य “कल्पनेपलीकडचं सौंदर्य” असल्याचं म्हटलं आहे. गणपती बाप्पाच्या परंपरेला आधुनिकतेची जोड देत, या व्हिडीओने श्रद्धा आणि सर्जनशीलतेचा सुंदर संगम घडवून आणला आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.