(फोटो सौजन्य: Instagram)
मुंबईतील लालबागचा राजा गणपती हे श्रद्धेचं, नवसाचं आणि भक्तीचं मोठं प्रतीक मानलं जातं. “नवसाला पावणारा राजा” म्हणून या गणपतीची ओळख निर्माण झाली आहे. दरवर्षी गणेशोत्सवात देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत येतात. तासनतास रांगेत उभं राहून, गर्दी-धक्काबुक्की सोसूनही लोक भक्तिभावाने बाप्पाचं दर्शन घेतात.
लालबागच्या या राजाला ऐतिहासिक महत्त्वही आहे. १९३२ साली परळमधील काही मच्छीमार आणि व्यापाऱ्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्थापन केलं. दोन वर्षांनी, म्हणजे १९३४ पासून लालबागचा राजा हा गणपती प्रथम विराजमान झाला. त्यावेळी मच्छीमार समाजाने बाप्पाला नवस केला होता आणि तो पूर्ण झाल्याचं मानून हा उत्सव सुरू झाला. तेव्हापासून हा राजा “नवसाला पावतो” असा लौकिक मिळवत गेलाय.
हल्ली एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. @mumbai.bucketlist या इंस्टाग्राम पेजवरून शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये १९३४ पासून २०२४ पर्यंतच्या ९० वर्षांतील लालबागच्या राजाच्या मूर्ती दाखवल्या आहेत. अवघ्या एक मिनिटाच्या व्हिडीओतून आपण या दीर्घ प्रवासाचं दर्शन घेऊ शकतो. सुरुवातीच्या काळात प्रत्येक वर्षी मूर्तीचा वेगळा डिझाईन असे, विविध भावमुद्रांमध्ये बाप्पा सजलेला असे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून एक विशिष्ट मूर्तीची रचना कायम ठेवण्यात आली आहे.
या व्हिडीओने अनेकांची मनं जिंकली आहेत. अनेकांनी जुन्या मूर्तींमधील विविधता आणि कलात्मकता यावर कौतुकाचं भाष्य केलं आहे. आतापर्यंत या व्हिडीओला १ कोटी ४० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, हेच दाखवतं की लालबागच्या राजाचं आकर्षण किती जबरदस्त आहे. लालबागचा राजा म्हणजे फक्त एक मूर्ती नव्हे, तर भक्ती, परंपरा आणि आशेचं प्रतीक आहे, जो गेली ९० वर्षं लाखो लोकांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू राहिलेला आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.