VIDEO VIRAL : अमेरिकेत चक्रीवादळाने घातला धुमाकूळ; सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Hurricane viral video : अमेरिकेच्या मध्यपश्चिम भागावर आलेल्या विनाशकारी चक्रीवादळामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. या वादळामुळे आतापर्यंत २१ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, ६.५ लाखांहून अधिक घरांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे. हवामान विभागाने या वादळाला अतिशय तीव्र स्वरूपाचे घोषित केले असून, अनेक राज्यांमध्ये आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे.
आग्नेय केंटकी राज्यातील लॉरेल काउंटी हा वादळाने सर्वाधिक प्रभावित झालेला भाग ठरला आहे. शुक्रवारी रात्री उशिरा आलेल्या वादळात ९ जणांचा मृत्यू झाल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले आहे. यामध्ये काहीजण जागीच ठार झाले असून, अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. लॉरेल काउंटीचे शेरीफ जॉन रूट यांच्या कार्यालयातर्फे जारी करण्यात आलेल्या निवेदनात सांगण्यात आले की, “बाधित भागांमध्ये अजूनही काही नागरिक अडकले असण्याची शक्यता आहे. शोध आणि बचाव मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे.” स्थानिक प्रशासन, अग्निशमन दल आणि स्वयंसेवी संस्थांनी मदतीसाठी कंबर कसली आहे.
मिसूरी राज्यातही परिस्थिती गंभीर असून, किमान सात नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. मिसूरीच्या विविध भागांमध्ये एकापेक्षा अधिक चक्रीवादळांची नोंद झाली असून, शुक्रवारी दुपारनंतर हवामान यंत्रणांनी धोक्याचा इशारा दिला होता. राजधानी सेंट लुईस मध्ये परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. शहराच्या महापौर कारा स्पेन्सर यांनी सांगितले की, “५,००० हून अधिक घरांवर वादळाचा परिणाम झाला आहे, अनेक इमारतींना नुकसान झाले असून, झाडे आणि विजेचे खांब उन्मळून पडले आहेत.” शहरात आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे, तसेच रात्री कर्फ्यू लावण्यात आला आहे जेणेकरून मदतकार्य सुरळीत पार पडू शकेल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : VIDEO VIRAL : 277 प्रवाशांसह मेक्सिकन नौदलाचे जहाज अचानक ब्रुकलिन ब्रिजवर आदळले, 19 जण जखमी, 4 गंभीर
वादळाचा प्रभाव विस्कॉन्सिन आणि ग्रेट लेक्स प्रदेशातही जाणवला असून, लाखो ग्राहकांचा वीजपुरवठा बंद झाला आहे. या परिसरातील अनेक भागांमध्ये विजेच्या तारांचा आणि यंत्रणांचा मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. दरम्यान, टेक्सास राज्यात उष्णतेची लाट उसळली असून, हवामान विभागाने नागरिकांना अत्यंत काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. तापमानाने ४० अंश सेल्सिअसचा पल्ला ओलांडल्यामुळे नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
BREAKING: A major tornado outbreak has occured yesterday and overnight across the MS/TN/OH Valley. Dozens of strong tornadoes occured over multiple states, including Missouri, Illinois, Indiana and Kentucky.
The tornado outbreak has been particularly devastating because of… pic.twitter.com/ZSc0Vp6KWy
— Knights OSINT (@KnightsOSINT) May 17, 2025
credit : social media
हवामान विभागाने पुढील काही दिवसांत आणखी वादळांचा इशारा दिला आहे. विशेषतः मिसूरी, केंटकी आणि इओवा या राज्यांमध्ये पुन्हा वादळी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, स्थानिक प्रशासनाने सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे, गरज नसताना घराबाहेर न पडण्याचे आणि आपत्कालीन किट तयार ठेवण्याचे आवाहन केले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पाकिस्तान लष्कराचे मुख्यालय भूमिगत बोगद्यात हलवले जाणार; भारताच्या कारवाईची भीती की युध्दाच्या सावटाची चाहूल?
वाऱ्याचा वेग, मुसळधार पाऊस, वीजपुरवठ्याचा ठप्प होणारा ढाचा, आणि मृत्यूची संख्या यामुळे अमेरिका पुन्हा एकदा निसर्गाच्या रौद्ररूपासमोर असहाय्य बनलेली दिसते. प्रशासनाच्या प्रयत्नांनंतरही लोकजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. वादळाचे थैमान अजून काही दिवस राहणार असल्याची शक्यता वर्तवली जात असून, पुढील ४८ तास हवामान विभागासाठी आणि नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे असतील. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे अत्यावश्यक आहे.