फोटो सौजन्य - Social Media
भारतात पाळीव प्राण्यांविषयीचा दृष्टिकोन वेगाने बदलत असून, ‘पेट ओनरशिप’पासून ‘पेट पॅरेंटिंग’कडे लोकांचा कल वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर इंस्टामार्टच्या ताज्या आकडेवारीनुसार, मुंबईने भारताची ‘कॅट कॅपिटल’ म्हणून अव्वल स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे, प्लॅटफॉर्मवरील पाळीव प्राण्यांच्या खाद्यपदार्थांच्या एकूण मागणीत जवळपास 60 टक्के वाटा मांजरांच्या खाद्यपदार्थांचा असून त्यांनी कुत्र्यांच्या खाद्यपदार्थांनाही मागे टाकले आहे.
अहवालानुसार, भारतीय ग्राहक आपल्या पाळीव प्राण्यांच्या आरोग्य आणि संगोपनावर पूर्वीपेक्षा अधिक खर्च करत आहेत. गेल्या वर्षभरात पेट केअर ऑर्डर्समध्ये 41 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. ग्रेन-फ्री फूड, प्रीमियम ट्रीट्स, विशेष पोषण आणि ग्रूमिंग उत्पादनांना मोठी मागणी असल्याचेही समोर आले आहे.
इंस्टामार्टवर “Cat Food” हा पाळीव प्राण्यांशी संबंधित सर्वाधिक शोधला जाणारा शब्द ठरला आहे. मुंबईनंतर बेंगळुरू, चेन्नई आणि कोलकाता ही शहरे मांजरप्रेमींच्या यादीत आघाडीवर आहेत. तर बेंगळुरू हे देशातील सर्वाधिक कुत्राप्रेमी शहर म्हणून समोर आले असून, हैदराबाद, मुंबई आणि दिल्ली यांचाही त्यात समावेश आहे.
खाद्यपदार्थांबरोबरच ग्रूमिंग उत्पादनांच्या मागणीतही मोठी वाढ झाली आहे. डॉग शॅम्पूच्या शोधांमध्ये तब्बल 600 टक्के वाढ नोंदवली गेली असून, ग्रेन-फ्री पेट फूडची मागणी 152 टक्क्यांनी वाढली आहे. तसेच पक्ष्यांच्या खाद्यपदार्थांच्या मागणीत 178 टक्के, तर सशांच्या खाद्यपदार्थांमध्ये 130 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे.
पेट केअर बाजाराचा विस्तार आता केवळ महानगरांपुरता मर्यादित राहिलेला नाही. टियर-2 आणि त्यापुढील शहरांमध्ये पेट केअर ऑर्डर्समध्ये वर्षभरात 96 टक्के वाढ झाली आहे. गुवाहाटी, डिब्रुगढ, मेरठ, मदुराई आणि कोट्टायम ही शहरे या वाढीमध्ये आघाडीवर आहेत. दरम्यान, दिल्लीतील एका पेट पॅरेंटने एका वर्षात आपल्या पाळीव प्राण्यांच्या संगोपनावर तब्बल 60,957 रुपये खर्च केल्याची नोंदही या अहवालात करण्यात आली आहे.






