(फोटो सौजन्य: X)
समुद्राच्या खोल पाण्यात अनेक रहस्यमयी गोष्टी दडल्या आहेत ज्यांची मानवाला फारशी माहिती नाही. इथे अनेक असे जीवही वसले आहेत ज्याची माहिती आपल्याला नाही. अशाच रहस्यमय जीवांपैकी एक म्हणजे ओअरफिश, ज्याला अनेक देशांमध्ये ‘डूम्सडे फिश’ म्हणून ओळखले जाते. याची दर्शनं खूपच दुर्मिळ असतात, पण जेव्हा तो समुद्राच्या पृष्ठभागावर दिसतो, तेव्हा तो अनेक प्रश्न आणि भीती उभ्या करतो. नुकतीच अशीच घटना तामिळनाडूच्या किनाऱ्यावर घडली आहे. ही घटना इतकी दुर्लभ आहे की त्याचे दृश्य आता सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे जे जोरदार व्हायरल होत आहे.
तामिळनाडूच्या स्थानिक मच्छिमारांच्या जाळ्यात एक विलक्षण मासा सापडला आहे. त्याचे चकाकणारे चांदीसारखे शरीर, लांबट रचना आणि डोक्याजवळ असलेले लालसर पंख हे बघून सर्वजण थक्क झाले. ओअरफिश सुमारे ३० फूटांपर्यंत लांब असू शकतो आणि तो साधारणपणे २०० ते १००० मीटर खोल समुद्रात राहतो. त्यामुळे त्याचे पृष्ठभागावर येणे हे केवळ दुर्मिळच नाही, तर थोडेसे चिंताजनकही मानले जाते. या माशाचे असे पृष्ठभागावर येणे सृष्टीच्या विनाशाचे संकेत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. याचा व्हिडिओ @sanatan_kannada नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये च्छीमार त्यांच्या बोटीवर एकत्रितपणे या माशाला उचलताना दिसतात. सात जण मिळून त्याला हाताळत आहेत आणि त्या क्षणाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करत आहेत.
ओअरफिश विषयी एक जुनी समजूत आहे की, त्याचे पृष्ठभागावर दिसणे ही एखाद्या नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना असते. विशेषतः २०११ मध्ये जपानमध्ये आलेल्या भूकंप व त्सुनामीपूर्वी अनेक ओअरफिश किनाऱ्यावर मृतावस्थेत सापडले होते. त्यामुळे अशा घटना ओअरफिश आणि भूकंप यामधील संबंधाचे संकेत देतात, असे अनेकांचे मत बनले. जपानी लोक मानतात की समुद्राच्या खोलवर हालचाली सुरु झाल्यावरच हे मासे वर येतात – म्हणूनच त्याला एक ‘नैसर्गिक इशारा’ मानले जाते. फक्त जपानच नाही, तर मेक्सिकोमध्येही ओअरफिश दिसल्यानंतर काही दिवसांत भूकंप झाला होता. त्यामुळे अनेक देशांमध्ये आता या मासाला ‘डूम्सडे फिश’ असे म्हटले जाते. आणि भारतात – विशेषतः तामिळनाडूच्या किनाऱ्यावर – तो आढळल्यानंतर पुन्हा एकदा लोकांमध्ये भीती आणि उत्सुकता वाढली आहे.
Doomsday fish have been found in Tamil Nadu, India. pic.twitter.com/MQWurkE9ZN
— ಸನಾತನ (@sanatan_kannada) May 31, 2025
बाप बाप होता है! मुलीसाठी वडिलांनी लावली जिवाची बाजी; चित्तथरारक VIDEO एकदा बघाच
मात्र, वैज्ञानिक दृष्टिकोन वेगळाच आहे. आजवर ओअरफिश आणि नैसर्गिक आपत्ती यामध्ये कोणताही ठोस वैज्ञानिक संबंध सापडलेला नाही. शास्त्रज्ञांच्या मते, त्याच्या पृष्ठभागावर येण्यामागे पर्यावरणीय बदल, समुद्राच्या तापमानातील फरक, प्रदूषण किंवा समुद्रतळातील काही विशिष्ट घडामोडी कारणीभूत असू शकतात. पण एक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे की, हा योगायोग आहे का, की एखादा अदृश्य इशारा? ओअरफिशचे प्रत्येक दर्शन आजही एक गूढ गोष्ट बनूनच राहते आहे… आणि त्याच्या खोल समुद्रातील अस्तित्वासोबत हे गूढ दिवसेंदिवस अधिक खोल होत जात आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.