Pakistan Helicopter Crashed : पाकिस्तानमध्ये मोठा अपघात, हेलिकॉप्टर कोसळून 5 जणांचा मृत्यू, जाणून घ्या काय आहे कारण? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Pakistan Helicopter Crashed : पाकिस्तान पुन्हा एकदा हवाई दुर्घटनेचा साक्षीदार ठरला आहे. सोमवारी (१ सप्टेंबर) दुपारी गिलगिट-बाल्टिस्तानमधील चिलास परिसरात लष्कराचे एमआय-१७ हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातात दोन पायलट आणि तीन तंत्रज्ञ अशा पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर हेलिकॉप्टरला भीषण आग लागली आणि आकाशात काळ्या धुराचे लोट उठताना स्थानिकांनी पाहिले.
एएफपीच्या वृत्तानुसार, हे हेलिकॉप्टर नवीन हेलिपॅडवर चाचणी लँडिंग करत होते. मात्र, लँडिंगदरम्यान संतुलन बिघडले आणि काही क्षणांतच ते कोसळले. स्थानिक पोलिसांनी व आपत्कालीन पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तथापि, अपघात एवढा भीषण होता की हेलिकॉप्टरमधील सर्व जणांना वाचवता आले नाही. अधिकृत स्तरावर या दुर्घटनेबाबत अजून कोणतेही निवेदन जाहीर झालेले नाही. मात्र, प्राथमिक अंदाजानुसार तांत्रिक बिघाड किंवा प्रतिकूल हवामान हे अपघाताचे कारण असावे, अशी चर्चा आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Afghanistan earthquake: अफगाणिस्तानमध्ये विध्वंसाचे भयानक दृश्य; 622 मृत, ‘या’ VIRAL VIDEO मध्ये पहा भूकंपाची भीषणता
अपघातात प्राण गमावलेले सर्वजण लष्कराशी संबंधित होते. दोन अनुभवी पायलट आणि तीन तंत्रज्ञांना या दुर्घटनेत आपला जीव गमवावा लागला. पाकिस्तानमधील सामाजिक माध्यमांवर या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले जात आहे. शोकसंदेशांचा वर्षाव होत असून, लोक सैन्यदलाच्या वीर जवानांप्रती आदर व्यक्त करत आहेत.
पाकिस्तानमध्ये गेल्या काही वर्षांत हेलिकॉप्टर अपघातांची मालिका पाहायला मिळते.
१५ ऑगस्ट २०२५ रोजी खैबर पख्तुनख्वाच्या मोहमंद जिल्ह्यात आणखी एक एमआय-१७ हेलिकॉप्टर कोसळले होते. पूरग्रस्त भागात मदतकार्य सुरू असताना खराब हवामानामुळे अपघात झाला. त्या वेळीही पाच जणांचा मृत्यू झाला होता.
२८ सप्टेंबर २०२४ रोजी उत्तर वझिरीस्तानमध्ये चार्टर्ड हेलिकॉप्टर इंजिन बिघाडामुळे कोसळले. हे हेलिकॉप्टर तेल कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जात होते.
२५ सप्टेंबर २०२२ रोजी बलुचिस्तानमध्ये लष्करी हेलिकॉप्टर कोसळून सहा जवान शहीद झाले होते.
या घटनांवरून एक गोष्ट स्पष्ट होते की पाकिस्तानमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनांची वारंवारिता चिंताजनक आहे.
पाकिस्तानसारख्या पर्वतीय प्रदेशात हेलिकॉप्टर हे वाहतुकीचे महत्त्वाचे साधन मानले जाते. दुर्गम भागात मदतकार्य, सैनिकांची ने-आण किंवा आपत्तीग्रस्तांना पोहोचण्यासाठी लष्करी हेलिकॉप्टरचा वापर सतत होत असतो. मात्र, वारंवार होणारे अपघात हे पाकिस्तानच्या हवाई सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. तांत्रिक देखभाल, हवामानाचा अंदाज, पायलटांचे प्रशिक्षण अशा अनेक बाबींमध्ये सुधारणा आवश्यक असल्याचे तज्ज्ञ सांगतात. कारण, प्रत्येक अशा दुर्घटनेत फक्त जवानांचाच नव्हे तर संपूर्ण देशाचाच अमूल्य जीवितहानीचा सामना करावा लागतो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Modi-Xi-Putin त्रिकुटाची जगभरात चर्चा; अमेरिकेनेही बदललेले सूर, म्हणाले भारत हा 21 व्या शतकापासून…
या अपघातानंतर स्थानिक जनता व नागरिकांमध्ये नाराजी आहे. अनेकांनी सोशल मीडियावर सरकारने तातडीने सुरक्षाविषयक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. “दर दोन-तीन महिन्यांनी हेलिकॉप्टर कोसळल्याची बातमी का यावी?” असा संतप्त प्रश्न नागरिक विचारत आहेत. दरम्यान, या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. चौकशी अहवाल आल्यानंतरच या दुर्घटनेमागचे खरे कारण स्पष्ट होईल.