पाकिस्तानमध्ये अंतर्गत कुरखोडीने वाढणार ताण; बलुच आर्मीने सुरु केले ऑपरेशन 'BAAM' (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
इस्लामाबाद: पाकिस्तानमध्ये सध्या गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. पाकिस्तानच्या बलुच लिबरेशन आर्मी आणि पाकिस्तान सैन्यामध्ये अंतर्गत कलह सुरु आहे. या संघर्षाने तीव्र रुप धारण केले असून गेल्या काही दिवसांपासून बलुच आर्मी पाकिस्तान सैन्यावर सतत हल्ले करत आहे. यासाठी बलुच आर्मीने मोहिम सुरु केली आहे. या अंतर्गत बलुच लिबरेशन आर्मी पाकिस्तानी लष्कराविरोधात एकामागून एक कारवाई करत आहे.
बलुच लिबरेशन आर्मीच्या या कारवायांनी तीव्र वेग धारण केला आहे. गेल्या तीन दिवसांत बलुच आर्मीने पाकिस्तान सैन्यावर तीव्र हल्ले केले आहेत. या हल्ल्यात ५० पाकिस्तानी सैनिक, आयएसआय एजंट्स आणि गुप्तचर संस्थांचे ९ एजंट ठार करण्यात आले आहेत. यामुळे पाकिस्तानमध्ये अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बलुच लिबरेशन आर्मीच्या हल्ल्यात आतापर्यंत ५१ सैनिक जखमी झाले आहेत. तसेच पाकिस्तानी सैन्याचे ५ ड्रोन बलुच सैन्याने नष्ट केले आहेत. बलुच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानी सैन्याविरोधाच्या या कारवाईला Operation BAAM असे नाव दिले आहे. ९ जुलै रोजी या मोहिमेची सुरुवात करण्यात आली. तेव्हापासून ११ जूलैपर्यंत ७२ तासांत बलुच सैन्यानी ८४ ठिकाणी हल्ले केल्याची माहिती समोर आली आहे.
एक दिवसापूर्वी ११ जुलै रोजी बलुच आर्मीने पाकिस्तानच्या ८ लष्करी छावण्यांवर हल्ला केला होता. यामध्ये १८ सैनिक ठार झाल्याची माहिती समोर आली होती. पाकिस्तानच्या बलुच लिबरेशन आर्मीने सर्व हल्ल्यांची जबाबादारी घेतली आहे. तसेच ही केवळ सुरुवात असल्याचेही म्हटले आहे. याशिवाय पाकिस्तान आणि चीनमधील आर्थिक प्रकल्पांवर देखील बलुचांनी हल्ले केले आहेत.
बलुच लिबरेशन आर्मीचे पाकिस्तानी लष्करावरील हल्ले दिवसेंदिवस तीव्र होत चालले आहेत. या वाढत्या हल्ल्यामुळे पाकिस्तानी लष्कराला मोठा धक्का बसला आहे. तर पाकिस्तानी सरकारने यावर अधिकृत पातळीवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.यामुळे देशात अस्थिरता वाढत आहे. बलुच लिबरेशन आर्मीची कारवाई केवळ लष्करी कारवायांपर्यंत मर्यादित राहिलेली नाही. बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी ही सामजिक आणि राजकीय चळवळीत बदलत आहे.