फोटो सौजन्य: सोशल मीडिया
नवी दिल्ली: बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंवर अत्याचार सुरूच आहे. शेख हसीना यांच्या देश सोडून गेल्यानंतर सत्तापालट झाली आणि मोहम्मद युनूस यांचे अंतरिम सरकार सत्तेत आले. अंतरिम सरकार सत्तेत आल्यानंतरही हिंदूंवरील हल्ले सुरूच आहेत. यामुळे हिंदूच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान दिल्लीतील जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी बांगलादेशाल पत्र लिहिले आहे. त्यांनी हिंदूवरील होणारे अन्याय आणि हल्ले थांबण्याची मागणी या पत्रात केली आहे.
देशाची आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा जपावी
इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी या पत्रात म्हटले आहे की, बांदलादेशाचा एक विश्वासू शेजारी, जवळचा मित्र आणि आपल्या सामायिक सांस्कृतिक वारशाचा संरक्षक म्हणून हे पत्र मी तुम्हाला लिहित आहे. मी बांगलादेशाच्या सरकारला तसेच नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांना विनंती करतो की, हिंदू अल्पसंख्यांकावरील कोणत्याही प्रकारचा अन्याय करु नये. यावर त्वरित पावले उचलली जावीत. यामुळे देशाची आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा निर्दोष राहील, असे त्यांनी म्हटले.
भारत-बांगलादेशाचे घनिष्ट संबंध
याशिवाय बुखारी यांनी आपल्या पत्रात हेही म्हटले आहे की, बांगलादेशाच्या स्थापनेपासून भारत-बांगलादेशाचे घनिष्ट संबंध आहेत.भारताने आमचे राष्ट्रीय नेतृत्व, मीडिया, नागरी समाज आणि प्रभावशाली लोकांनी शेख मुजीबुर रहमान, त्यांची मुलगी शेख हसीना वाजिद आणि त्यांचा पक्ष अवामी लीग यांच्याशी घनिष्ठ संबंध ठेवले आहेत. तसेच बांगलादेश नेहमीच भारताच्या पाठीशी आंतरराष्ट्रीय समस्या आणि मुस्लिम जगाशी संबंधित बाबींमध्ये उभा राहिला आहे.
फोटो सौजन्य: सोशल मीडिया
संयुक्त राष्ट्रांचा उल्लेख
तसेच त्यांनी संयुक्त राष्ट्रांचा उल्लेख करत म्हटले की, अल्पसंख्याकांच्या समान हक्कांच्या संरक्षणाबाबत संयुक्त राष्ट्रांने घोषणा केली आहे. याचे पालन करणे आंतरराष्ट्रीय समुदायाच्या सर्व सदस्यांना आणि संयुक्त राष्ट्रांच्या सर्व सदस्य राष्ट्रांना बंधनकारक आहे. यामुळे हिंदूंवरील अन्याय, हल्ले आणि एकतर्फी कारवाई निंदनीय असून हे त्वरित थांबवण्यात यावे. तसेच अशा कृतींचे आम्ही समर्थन करत नाही असेही बुखारी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
हिंदूवरील अत्याचार सुरूच
शेख हसीना यांच्या देश सोडून गेल्यानंतर सत्तापालट झाली आणि मोहम्मद युनूस यांचे अंतरिम सरकार सत्तेत आले. अंतरिम सरकार सत्तेत आल्यानंतरही बांगलादेशात हिंदू समुदायावरील ह्ल्ले सुरूच आहेत. चिन्मय दास आणि त्यांच्यासह आणखी दोन हिंदू व्यक्तींच्या अटकेनंतर हा हिंसाचार अधिक उफाळला आहे. चितगाव येथील इस्कॉन पुंडरिक धामचे अध्यक्ष चिन्मय प्रभू यांच्या अटकेनंतर परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे. चिन्मय प्रभू यांच्या अटकेच्या निषेध करत हजारो हिंदू लोक रस्त्यावर उतरले आहेत.