बेल्जियमच्या भावी राणी एलिझाबेथ यांच्या शैक्षणिक प्रवासात अडथळा; ट्रम्प यांच्या निर्णयाने राजघराण्यात चिंतेचे वातावरण (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सतत कोणत्या ना कोणत्या निर्णयाने जगाला झटका देत असतात. दरम्यान पुन्हा एकदा त्यांच्या एका निर्णयाने जगभर खळबळ उडाली आहे. त्यांच्या नवीन धोरणांचा परिणाम बेल्जियमची भावी राणी एलीझाबेथ यांच्यावर झाला आहे. एलिझाबेथ यांच्या शैक्षणिक प्रवासात अडथळा निर्माण झाला आहे. यामुळे राजघराण्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ट्रम्प यांनी हार्वर्ड विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांवर अनेक निर्बंध लादले आहे. याचा परिणाम एलिझाबेथ यांच्या शिक्षणावर होत आहे.
बेल्जियमच्या भावी राणी एलिझाबेथ हार्वर्ड विद्यापीठात पब्लिक पॉलीसीचे पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. सध्या त्यांनी पदव्युत्तर शिक्षणाचे पहिले वर्ष पुण केले आहे. परंतु ट्रम्प यांच्या नवीन धोरणांमुळे २३ वर्षीय भावी राणी एलिझाबेथ यांना अमेरिकेच्या हार्वर्ड विद्यापीठात शिक्षण घेता येणार नाही.
सध्या त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीबद्दल अनिश्चितता निर्माण झाली आहे. एलिझाबेथ या बेल्जियमचे राजा फिलिप आणि राणी मॅथिल्डे यांची मोठी मुलगी आहे. हार्वर्ड युनिव्हर्सिटीत शिक्षण घेण्यापूर्वी एलिझाबेथ यांनी युनायटेड किंग्डमच्या ऑक्सफर्ड विद्यापीठातू इतिहास आणि राजकारणात पदवी प्राप्त केली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने गुरुवारी हार्वर्ड विद्यापीठात परदेश विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. तसेच विद्यमान परदेशी विद्यार्थ्यांना इतर संस्थांमध्ये स्थलांतरित करण्याचे आदेश दिले आहे. नाहीतर व्हिसा रद्द करण्यात येईल असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. दरम्यान त्यांच्या या निर्णयाचा परिणाम बेल्जियमची राजकुमारी एलिझाबेथ यांच्या शिक्षणावर होण्याची शक्यता आहे.
बेल्जियम राजघराण्याच्या प्रवक्त्या लोरो व्हॅंर्डून यांनी याबाबत बोलताना म्हटले की, राजकुमारी एलिझाबेथ यांनी नुकतेच पदव्युत्तर शिक्षणाचे पहिले वर्ष पुर्ण केले आहे. सध्या ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयाचा परिणाम काय होईल सांगणे कठीण आहे, पुढील आठवड्यात सर्व काही स्पष्ट होईल. सध्या या परिस्थितीची चौकशी सुरु आहे. तसेच राजघराण्याच्या कम्युनिकेशन्स डायरेक्टर झेवियर बार्ट यांनी सध्या परिस्थितीचे निराकरण करत असल्याचे म्हटले आहे.
दरम्यानम ट्रम्प यांच्या निर्णयाला हार्वर्ड विद्यापीठाने तीव्र विरोध केला आहे. हार्वर्ड विद्यापीठाने ट्रम्प यांच्या निर्णयाला बेकायदेशीर आणि सूडबुद्धीने प्रेरित म्हणून संबोधले आहे. विद्यापीठाने म्हटले की, या निर्णयाचा परिणाम हजारो परदेशी विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर आणि भविष्यावर होणार आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयाचा परिणाम सामान्य विद्यार्थ्यांच्या नव्हे तर राजघराण्यानवरही होत आहे. यामुळे संपूर्ण जगभरात खळबळ उडाली आहे.