ईदच्या उत्सवादरम्यान पाकिस्तानमध्ये अंतर्गत संघर्ष; बीएलएच्या हल्ल्यात १२ सैनिक ठार (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
इस्लामाबाद: गेल्या काही आठवड्यांपासून पाकिस्तानमध्ये अंतर्गत कलह सुरु आहे. बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) आणि पाकिस्तानच्या लष्करात चकामक सुरु आहे. याकाळात बीएलएने पाकिस्तान सैन्यावर अनेकवेळा हल्ला केला आहे. यामुळे पाकिस्तान लष्कराचे मोठे नुकसान होत आहे. दरम्यान बलुच लिबरेशन आर्मीने पुन्हा एकदा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला केला असून १२ सैनिकांना ठार केले आहे. तसेच पाकिस्तानच्या ISI या गुप्तचर संघटनेच्या एजंटचीही हत्या केली आहे. हा हल्ला ईदच्या उत्सवादरम्यान करण्यात आला आहे. यामुळे पाकिस्तानमध्ये गोंधळ उडाला आहे.
आतापर्यंतच्या प्रत्येक हल्ल्याची बीएलएने जबाबदारी घेतली आहे. बलुचिस्तानमधील नोश्की, कलाट, मास्टुंग आणि क्वेटामध्ये चार वेगवेगळ्या ठिकाणी हल्ला केल्याची कबूली दिली आहे. हल्ल्यात बीएलने लहान शस्त्रांचा गोळीबार आणि ग्रेनेडचा वापर केला आहे. गेल्या २४ तसांत लष्कराचे १२ सैनिक आणि गुप्तचर एजंटला बीएलएने ठार केले आहे. बीएलएच्या प्रवक्त्याने पाकिस्तानच्या बलुचिस्तानमधील कृत्यांचा बदला म्हणून आरोप केला आहे.
बीएलएच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, नोश्कीच्या दो साई भागातील लष्कराच्या ताफ्यावर हल्ला केला. तसेच कलाटमध्ये मंगोचर येथे कॉलेज कॅम्पसमधील लष्करी चौकीवर हल्ला केला, ज्यात चीन सैनिक ठार झाले आणि चार जखणी झाले. तसेच मास्टुंगमधील लष्करी चौकीवर बीएलएने ग्रेनेड हल्ला केला होता. तर क्वेटा येथे करणी रोडवर रहिवासी गुलजार नसी देहवार याची हत्या बीएलएने केल्याचे कबुल केले आहे. नसीर पाकिस्तानच्या लष्कराचा एजंट होता असे बीएलएने म्हटले.
गेल्या काही महिन्यांत पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये फुटीरतावादी चळवळी तीव्र झाल्या आहेत. सातत्याने पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये हल्ले होत आहेत. यामध्ये दोन महिन्यांपूर्वी जाफर एक्सप्रेसवरील हल्ला सर्वात मोठा हल्ला मानला गेला होता. या हल्ल्यात बीएलएने ९० सैनिकांचा मृत्यूमुखी पाडले. बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी हा लढा सुरु असल्याचे बीएलएने म्हटले आहे. पाकिस्तानमध्ये सध्या बीएलएची ताकद वाढत आहे. यामुळे सरकारसमोर अनेक आव्हाने निर्माण होत आहेत.
एकीकडे पाकिस्तान अंतर्गत कलहाच शिकार बनत चालला आहे, तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानचा दहशतवादाला पाठिंब्याचा पर्दाफाश झाला आहे. तसेच पाकिस्तानमध्ये आर्थिक संकट देखील वाढत आहे. दिवसेंदिवस पाकिस्तानला नव्या संकटाचा सामाना करावा लागत आहे.