युक्रेनसाठी युरोप एकत्र; अमेरिकेला उत्तर देण्यासाठी करणार महायुती ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
लंडन : अमेरिकेने युक्रेनच्या मदतीबाबत घेतलेल्या अनिश्चित भूमिकेमुळे युरोप आता स्वतःच या प्रश्नावर पुढाकार घेत आहे. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांनी लंडनमध्ये एक महत्त्वपूर्ण युक्रेन शिखर परिषद आयोजित केली, जिथे युरोपियन नेत्यांनी एकत्र येत युक्रेनच्या मदतीसाठी ठोस निर्णय घेतला. ही परिषद अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यातील चर्चेनंतर अवघ्या दोन दिवसांत आयोजित करण्यात आली. वॉशिंग्टनमध्ये ओव्हल ऑफिसमध्ये झालेल्या बैठकीनंतर झेलेन्स्की कोणताही ठोस करार न करता मायदेशी परतले, यामुळे युक्रेनला अमेरिकेच्या मदतीचा मोठा फटका बसला. या घडामोडींनंतर युरोपने युक्रेनच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.
युरोपियन नेत्यांची ठाम भूमिका
युक्रेनला मदतीच्या मुद्द्यावरून ब्रिटनच्या पंतप्रधान कीर स्टारमर यांनी युरोपीय नेत्यांना एकत्र आणले. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, युरोपने आता संरक्षणावर अधिक भर द्यावा आणि स्वतंत्रपणे निर्णय घ्यावा. युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेन यांनी सुचवले की युरोपियन युनियनने आर्थिक समस्या कमी करण्यासाठी कर्ज नियम शिथिल करावेत, जेणेकरून युक्रेनच्या मदतीसाठी अधिक निधी उपलब्ध करता येईल. याशिवाय, युरोपियन देशांनी संरक्षणावर अधिक खर्च करण्यास सहमती दर्शवली आहे. स्टारमर यांनी जाहीर केले की, ब्रिटन, युक्रेन, फ्रान्स आणि इतर काही देश मिळून एक स्वतंत्र युती तयार करतील आणि डोनाल्ड ट्रम्प यांना शांतता प्रस्थापित करण्यासाठी एक योजना सादर करतील.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Multiple Marriages: एक नाही, दोन नाही… या व्यक्तीने केली 53 लग्न, जाणून घ्या त्याने का केले असे?
ब्रिटनकडून युक्रेनसाठी 1.6 अब्ज पौंडांची मदत
पंतप्रधान स्टारमर यांनी युक्रेनसाठी 1.6अब्ज पौंड ($२ अब्ज डॉलर्स) ब्रिटिश निर्यात वित्त मदतीची घोषणा केली. या निधीतून ५,००० हून अधिक हवाई संरक्षण क्षेपणास्त्रे खरेदी केली जाणार आहेत. याशिवाय, युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. स्टारमर म्हणाले, “आज आपण इतिहासाच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर आहोत. पुढील वाटाघाटींसाठी वेळ नाही, आता कारवाई करण्याची वेळ आहे. न्याय्य आणि चिरस्थायी शांततेसाठी एकत्र येणे आणि ठोस पावले उचलणे आवश्यक आहे.”
युरोप अमेरिकेच्या मदतीशिवायही सक्षम
युरोपियन देशांनी एकमुखाने युरोप स्वतःचे संरक्षण स्वतः करू शकतो, असे मत व्यक्त केले आहे. ट्रम्प प्रशासनाकडून युक्रेनच्या मदतीबाबत होत असलेल्या अनिश्चिततेमुळे युरोप आता स्वतंत्रपणे निर्णय घेण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. स्टारमर यांनी यावर भाष्य करताना म्हटले, “युक्रेनला संरक्षण आणि शांतता यासाठी आपल्या पाठिंब्याची सर्वाधिक गरज आहे. यासाठी केवळ शब्द नव्हे, तर ठोस कृती आवश्यक आहे.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : America Ukraine Tension : झेलेन्स्कींचा ‘प्लॅन बी’ तयार, ट्रम्प मदतीला न आल्यास युक्रेनला इतर पर्याय उपलब्ध
युक्रेनला युरोपचा ठाम पाठिंबा
युक्रेनच्या अध्यक्ष झेलेन्स्की आणि ट्रम्प यांच्यातील चर्चेअंती अमेरिकेच्या मदतीबाबतची अनिश्चितता वाढली असली, तरी युरोपियन देशांनी युक्रेनला मदतीसाठी एकत्र येण्याचा निर्धार केला आहे. ही परिषद युरोपच्या बदलत्या भूमिकेचे स्पष्ट संकेत देते. यामुळे युक्रेनच्या लष्करी आणि आर्थिक मदतीत वाढ होईल आणि त्याचा रशियाविरुद्धच्या संघर्षात मोठा फायदा होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. आता युरोप आणि अमेरिका यांच्यातील मतभेद वाढणार का, युरोप स्वतंत्र संरक्षण युती स्थापन करणार का, आणि ट्रम्प प्रशासन यावर काय प्रतिक्रिया देणार, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.