सौदी अरेबियाच्या अबू अब्दुल्लाने शाश्वत आनंदाच्या शोधात 53 वेळा लग्न केले. ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
रियाध – जगभरात लग्न ही आयुष्यभर टिकणारी वचनबद्धता मानली जाते. भारतासह अनेक देशांमध्ये लग्नाला सात जन्मांचे पवित्र नाते मानले जाते. परंतु, सौदी अरेबियातील ६३ वर्षीय अबू अब्दुल्लाने या परंपरेला छेद देत तब्बल ५३ वेळा विवाह केला आहे. त्यांच्या या अनोख्या जीवनशैलीने संपूर्ण जगाला आश्चर्यचकित केले आहे.
लग्नाचा अनोखा प्रवास
अबू अब्दुल्ला यांचा पहिला विवाह ते अवघ्या २० वर्षांचे असताना झाला. त्यांच्या पहिल्या पत्नीची वयाने सहा वर्षांनी मोठी होती. विवाहानंतर सुरुवातीचे काही वर्षे अत्यंत सुखात गेली. त्यांच्या संसारात मुलेही झाली, मात्र काही वर्षांनी मतभेद वाढू लागले आणि त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. या वैवाहिक अडचणींमुळे त्यांनी वयाच्या २३व्या वर्षी दुसरे लग्न केले. मात्र, त्यांच्या पहिल्या आणि दुसऱ्या पत्नीमध्ये वाद सुरु झाले. या तणावातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी तिसरे आणि नंतर चौथे लग्न केले. पण तरीही त्यांना त्यांच्या पत्नींमधील वाद आणि मतभेद थांबवता आले नाहीत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : America Ukraine Tension : झेलेन्स्कींचा ‘प्लॅन बी’ तयार, ट्रम्प मदतीला न आल्यास युक्रेनला इतर पर्याय उपलब्ध
पत्नींच्या भांडणांमुळे पुन्हा पुन्हा विवाह
अबू अब्दुल्ला यांनी त्यांच्या पत्नींमधील वादामुळे अनेक वेळा घटस्फोट घेतले आणि पुन्हा नव्याने लग्न केले. त्यांनी एकूण ५३ वेळा विवाह केला आणि अनेक वेळा घटस्फोट घेऊन नवे संबंध जोडले. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना एक स्थिर आणि समाधानी वैवाहिक जीवन हवे होते, मात्र त्यांना अशी जोडीदार कधीच सापडली नाही जी त्यांना संपूर्ण समाधान देईल.
लग्न का केले इतक्या वेळा?
अबू अब्दुल्ला यांनी सांगितले की, त्यांना त्यांच्या वैवाहिक आयुष्यात स्थिरता आणि आनंद हवा होता. मात्र, प्रत्येक विवाहानंतरही त्यांना समाधान मिळत नव्हते. त्यामुळे त्यांनी पुन्हा विवाह करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या मते, त्यांचे उद्दिष्ट केवळ शरीरसुख नव्हते, तर एक समजूतदार आणि प्रेमळ जोडीदार शोधणे हे होते.
बहुपत्नीत्वाची प्रथा आणि सामाजिक दृष्टीकोन
सौदी अरेबियात इस्लामिक कायद्यांनुसार पुरुषांना चार पत्नी ठेवण्याची परवानगी आहे. मात्र, त्यासाठी प्रत्येक पत्नीला समान वागणूक द्यावी लागते. भारतासह अनेक देशांमध्ये कायद्याने बहुपत्नीत्वावर बंदी आहे. तरीही, काही ठिकाणी धार्मिक, सामाजिक किंवा वैयक्तिक कारणांमुळे अनेक विवाह होतानाचे उदाहरण आढळते. अबू अब्दुल्लाची कहाणी अशा व्यक्तींच्या मानसिकतेबद्दल मोठे प्रश्न उपस्थित करते. अनेक विवाह करूनही त्यांना हवे तसे वैवाहिक जीवन मिळाले नाही, हे त्याच्या निवडीबाबत पुनर्विचार करण्यास भाग पाडते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : America Ukraine Tension : झेलेन्स्कींचा ‘प्लॅन बी’ तयार, ट्रम्प मदतीला न आल्यास युक्रेनला इतर पर्याय उपलब्ध
जगभरात आश्चर्य आणि चर्चेचा विषय
अबू अब्दुल्लाच्या ५३ लग्नांची कहाणी ऐकून अनेकांना आश्चर्य वाटते. अनेक देशांत ही गोष्ट चर्चेचा विषय बनली आहे. प्रेम, समजूतदारपणा आणि विश्वास या गोष्टींच्या अभावामुळेच त्यांच्या नात्यांमध्ये यश आले नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. आजही जगात अनेक विचित्र किस्से घडतात, पण अबू अब्दुल्लाच्या अनोख्या विवाहप्रसंगाने संपूर्ण जगाला चकित केले आहे.