चीनला टॅरिफचा फटका? अमेरिकेसोबत तणाव कमी करण्यासाठी चर्चा सुरू (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
बिजिंग: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिको, कॅनडा आणि चीनवरील आयात उत्पादनांवर कर लादला होता. त्यांच्या या निर्णयामुळे तीन्ही देश संतप्त झाले होते. काही काळानंतर ट्रम्प यांनी मेक्सिको आणि कॅनडावरील कराचा निर्णय 4 मार्चपर्यंत स्थगित केल्याची घोषणा केली होती. मात्र, चीनला यातून सुटका मिळाली नव्हती. अमेरिकेने चीनवर 10% कर लादला होता. यामुळे चीन आणि अमेरिकेत व्यापर युद्ध सुरु होऊन चीनने देखील प्रत्युत्तर दाखल अमेरिकेवर 10 ते 15% कर लादले होते. दरम्यान आता चीन आणि अमेरिका यांच्यात व्यापार आणि आर्थिक संबंधांसंदर्भात एक महत्त्वाची बैठक पार पडली आहे.
व्हिडीओकॉलवर दोन्ही देशांत चर्चा
या बैठकीत दोन्ही देशांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. चीनचे उप-प्रधानमंत्री हे लीफेंग आणि अमेरिकेचे वित्त मंत्री स्कॉट बेसेंट यांच्यात शुक्रवारी व्हिडिओ कॉलद्वारे ही बैठक पार पडली. अमेरिकेच्या विनंतीनुसार झालेल्या या चर्चेमध्ये द्विपक्षीय व्यापार आणि आर्थिक सहकार्याशी संबंधित अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर सखोल चर्चा झाली.
या बैठकीदरम्यान दोन्ही देशांनी मान्य केले की चीन-अमेरिका व्यापार आणि आर्थिक संबंध जागतिक स्थिरतेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे दोन्ही देशांनी समान हितसंबंधांशी निगडीत मुद्द्यांवर चर्चा सुरू ठेवण्याची तयारी दर्शवली. या बैठकीचे आयोजन चीन आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये नुकत्याच झालेल्या फोन कॉलच्या सहमतीनुसार करण्यात आले होते.
ट्रम्प यांचा रेसिप्रोकल टॅरिफ चा निर्णय
अलीकडेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले की, अमेरिका सर्व देशांवर ‘रेसिप्रोकल टॅरिफ’ लागू करणार आहे. म्हणजेच, जो देश अमेरिकेवर जितका कर लावेल, अमेरिका त्याच प्रमाणात कर लावेल. चीन देखील त्या देशांपैकी एक आहे, जो अमेरिकेवर मोठ्या प्रमाणावर कर लावतो. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे चीन चिंतेत असून, हा निर्णय संपूर्ण जागतिक व्यापारावर परिणाम करू शकतो, असे चीनने नमूद केले आहे.
अमेरिकन निर्बंधांवर चीनची नाराजी
या बैठकीदरम्यान चीनने अमेरिकेने लादलेल्या नवीन निर्बंधांविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. अमेरिकेने अलीकडेच चीनच्या अनेक कंपन्यांवर व्यापारिक निर्बंध लावले आणि अतिरिक्त टॅरिफ लावले, यामुळे दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. चीनने स्पष्ट सांगितले की, या निर्बंधांमुळे दोन्ही देशांचे आर्थिक संबंध धोक्यात येऊ शकतात. तसेच, अमेरिका संतुलित आणि न्याय व्यापार धोरण अवलंबेल, अशी चीनने अपेक्षा व्यक्त केली आहे.
अमेरिकेच्या धोरणावर प्रश्नचिन्ह
चीनचा असा विश्वास आहे की अमेरिकेच्या धोरणांमुळे जागतिक बाजारात अस्थिरता निर्माण होऊ शकते. गेल्या काही वर्षांत अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारिक तणाव वाढला आहे, कारण अमेरिकेने अनेक चीनी कंपन्यांवर बंदी घातली आणि जास्त कर आकारला आहे. उप-प्रधानमंत्री हे लीफेंग यांनी यासंबंधी तीव्र आक्षेप व्यक्त केला आणि सांगितले की हे पाऊल आर्थिक सहकार्याच्या भावनेच्या विरोधात आहेत.
जागतिक बाजारावर परिणाम
अमेरिका आणि चीन या जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था आहेत, त्यामुळे त्यांच्या व्यापार धोरणांचा जागतिक बाजारावर मोठा परिणाम होतो. तज्ज्ञांच्या मते, जर दोन्ही देश व्यापार तणाव सोडवण्यात यशस्वी झाले, तर जागतिक व्यापाराला बळ मिळेल. मात्र, अमेरिका आपले निर्बंध कायम ठेवत राहिली, तर संपूर्ण आशियाई बाजारावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.