'या' प्रकल्पावरुन डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क यांच्यात मतभेद? काय आहे संपूर्ण प्रकरण? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन: अमेरिकेचे दोन प्रमुख उद्योगपती एलॉन मस्क आणि OpenAI चे साईओ सॅम ऑल्टमन यांच्यात सोशल मीडियावर वाद निर्माण झाला आहे. या वादाचे कारण स्टारगेट नावाचा प्रकल्प असून, आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) तंत्रज्ञानाच्या भविष्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात विविध प्रश्न उपस्थित झाले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील AI वर लक्ष केंद्रित करण्यास भर दिला होता.
काय आहे स्टारगेट प्रकल्प?
OpenAI, सॉफ्टबँक आणि ओरेकल यांनी संयुक्तपणे स्टारगेट प्रकल्पाची घोषणा केली आहे. या प्रकल्पाचा उद्देश अमेरिका आणि जागतिक स्तरावर AIच्या पायाभूत सुविधा उभारणे आहे. व्हाइट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले होते.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या प्रकल्पाला इतिहासातील सर्वात मोठा AI इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प म्हणून संबोधले आहे. या प्रकल्पासाठी प्रारंभी 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्यात येणार असून पुढील चार वर्षांत एकूण 500 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक अपेक्षित आहे. यामुळे अमेरिकेत 1 लाखांहून अधिक रोजगार निर्माण होणार असल्याचे अमेरिकन तज्ज्ञांनी म्हटले आहे.
एलॉन मस्क यांची टीका
मात्र, एलॉन मस्क यांनी या प्रकल्पावर टीका करताना OpenAI आणि सॉफ्टबँकला आर्थिकदृष्ट्या अशक्त ठरवले आहे. एलॉन मस्क यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत म्हटले की, “सॉफ्टबँककडे पुरेशी भांडवली क्षमता नाही. त्यांनी फक्त 10 अब्ज डॉलर्सची रक्कम सुरक्षित केली आहे.” मस्क यांनी दावा केला आहे की, त्यांना ही माहिती एका विश्वासार्ह स्त्रोताकडून मिळाले आहे.
सॅम ऑल्टमन यांची प्रतिक्रीया
एलॉन मस्क यांच्या टीकेला उत्तर देताना AI चे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी त्यांच्यावर चुकीची माहिती पसरवल्याचा आरोप केला. ऑल्टमन यांनी, “स्टारगेट प्रकल्प अमेरिकेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. मला समजते की देशासाठी चांगले असलेले प्रकल्प नेहमीच तुमच्या कंपन्यांच्या हिताचे नसतात. पण, तुमच्या नव्या जबाबदारीमुळे मला आशा आहे की तुम्ही देशाला प्राधान्य द्याल” असे म्हटले आहे.
मस्कचा मागील वाद
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी एलॉन मस्क यांनी ऑल्टमनच्या OpenAI कंपनीवर खटला दाखल केला होता. खटल्यात मस्क यांनी OpenAIवर नफा कमवण्याच्या उद्देशाने त्याच्या मूळ गैर-लाभकारी धोरणांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. एलॉन मस्क यांच्या Xai कंपनीनेही एआय सिस्टीम विकसित करण्यासाठी डेटा सेंटर उभारले आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, त्यांनी मेम्फिस येथील डेटा सेंटरवर 12 अब्ज डॉलर्स खर्च केले असून ते सुरु करण्यासाठी आणखी गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. एलॉन मस्क आणि ऑल्टमन यांच्यातील या वादामुळे तंत्रज्ञान क्षेत्रातील स्पर्धा आणि अमेरिका प्रथम धोरण यावर चर्चा सुरू झाली आहे. हे मतभेद केवळ वैयक्तिक नव्हे, तर जागतिक एआय क्षेत्रावर परिणाम करणारे ठरू शकतात असे म्हटले जात आहे.