netanyahhu photo credit - social media
इज्राइल मधील राजकीय चर्चेला उधाण आले आहे. कारण देशात निवडणुकांची तारीख आता जाहीर झाली आहे. येत्या २७ ऑक्टोबरला या निवडणुका होतील. ही निवडणूक ऐतिहासिक आणि राजकीय दृष्ट्या महत्वाची मानली जात आहे. कारण ७ ऑक्टोबर २०२३ मध्ये हमास ने केलेला हल्ला, त्यानंतर गाझा, लेबनान आणि ईराण यांच्यासोबत झालेल्या युद्धानंतर इज्राइल मधली ही पहिलीच राष्ट्रीय निवडणूक आहे.
या निवडणुकीत अतिआर्थोडॉक्स ज्यूंची सैन्यात सक्तीची भरती हा स्फोटक मुद्दा बनून समोर आला आहे. नेतन्याहूंच्या युतीतील सहकारी पक्षांना त्यांच्या समुदायाला लष्करी सेवेतून सूट मिळावी असे वाटते. तर दुसरीकडे सर्वसामान्य जनता आणि सैन्याचे म्हणणे आहे की, सध्याच्या युद्धाच्या परिस्थितीचा विचार करता आणखी जास्त सैनिकांची गरज आहे.याशिवाय नेतन्याहूंवर सुरू असलेले भ्रष्टाचाराचे खटले, वादग्रस्त न्यायिक सुधारणा आणि गाझामधील युद्धानंतरची व्यवस्था हे देखील असे मुद्दे आहेत जे मतदारांच्या भूमिकेवर परिणाम करतील.
बेंजामिन नेतन्याहू हे इज्राईलच्या इतिहासात सर्वात जास्त काळ पंतप्रधान राहिलेले नेते आहेत. आता 76 वर्षांच्या वयात ही निवडणूक त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठे आव्हान ठरणार आहे.जरी नेतन्याहूंनी स्पष्ट केले असले की ते पुन्हा निवडणूक लढवतील आणि आपले सरकार स्थापन करतील, तरीही अलीकडील सर्वेक्षण त्यांच्या बाजूने दिसत नाही.
या निवडणुकीत ७ ऑक्टोबर २०२३ ला सुरक्षेत झालेली चूक, या चुकीला घेऊन इज्राइली नागरिकांचा नेतन्याहू यांच्यावर खूप रोष आहे. तसेच याच्या व्यतिरिक्त हिब्रू युनिव्हर्सिटी ऑफ जेरुसलेम यांच्या सर्वे नुसार ९२% इज्राइली नागरिकांना असे वाटते कि सध्याच्या चाललेल्या युद्धात इज्राइल पेक्षा ईराण ची स्थिती चांगली आहे. अमेरिका इज्राइल यांच्या ईराण वरील हल्ल्यानंतर झालेला युद्धविराम आणि तेहरान वॊशिंग्टन करारा मध्ये इज्राइल च्या हिताचं काहीच घडलं नाही. असे लोकांचे मत झाले आहे. आणि याच मुळे नेतन्याहू यांची लोकप्रियता कमी होत चालली आहे.
नेतन्याहू यांच्या समोर यावेळी माजी लष्कर प्रमुख गादी आइजेनकोट यांचं आव्हान आहे. सर्वे सांगतात कि नेतन्याहू आणि त्यांच्या राष्ट्रवादी आणि धार्मिक पक्षांच्या युतीला बहुमत मिळणं थोडं अवघड आहे. परंतु विरोधी पक्षालाही सत्ता स्थापन करण्यासाठी पुरेसे पर्याय उपलब्ध नाहीत. यामध्येच येत्या २७ ऑक्टोबरला कळू शकेल की नेतन्याहू यांना इज्राइली नागरिक पुन्हा सत्तेवर बसवतील कि सत्तेवरून पायउतार करतील.






