काबुल : अमेरिकेची गुप्तचर संघटना सीआयएने (CIA) अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये (Kabul) अल-जवाहिरीला (Al-Zawahiri) लक्ष्य केले आहे. ड्रोन हल्ल्यात अल-जवाहिरी ठार झाला असून अफगाणिस्तानातील दहशतवादविरोधी मोहिमेतील हे अमेरिकेचे सर्वात मोठे यश आहे. ओसामा बिन लादेनचा (Osama Bin Laden) खात्मा केल्यानंतर अल कायदा या दहशतवादी संघटनेला हा सर्वात मोठा धक्का आहे.
अल-जवाहिरीवर अमेरिकेने २५ दशलक्ष डॉलर इतक्या मोठ्या बक्षिसाची घोषणा केली होती. ओसामा बिन लादेनला ११ वर्षांपूर्वी पाकिस्तानातील अबोटाबाद येथे केलेल्या कारवाईत ठार केले होते. त्यानंतर जवाहिरी हा अल कायदाचा प्रमुख झाला होता. अयमान अल-जवाहिरीचा जन्म १९ जून १९५७ रोजी इजिप्तमधील एका उच्चभ्रू कुटुंबात झाला. व्यवसायाने सर्जन असलेल्या अल-जवाहिरीचे अरबीसह फ्रेंच भाषेवरही प्रभुत्व होते. जवाहिरीने इजिप्शियन इस्लामिक जिहाद (EIJ) या संघटनेची स्थापना केली होती.
७० च्या दशकात इजिप्तमधील धर्मनिरपेक्ष सरकारविरोधात संघटना आक्रमक भूमिका घेत होती. धर्मनिरपेक्ष सत्ता उलथवून इजिप्तमध्ये इस्लामिक राजवट कायम ठेवण्यासाठी जवाहिरीच्या संघटनेने उद्दिष्ट होते.