Ishaq Dar Visit Bangladesh: आधी मेजवानी… मग अपमान! एका दिवसातच का तुटले पाकिस्तान-बांगलादेश संबंध? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Ishaq Dar Visit Bangladesh : राजनैतिक जगतात एकच म्हण आहे “संबंध उभारताना दशकं लागतात, पण तुटण्यासाठी एका दिवसाचीसुद्धा गरज नसते.” पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांच्या अलीकडील बांगलादेश दौऱ्याने हीच म्हण खरी ठरवली. १३ वर्षांनंतर झालेल्या या दौऱ्याची सुरुवात मैत्रीच्या वातावरणात झाली, पण शेवट अपमानाच्या छायेत.
इशाक दार यांचा हा दौरा खरेतर एप्रिलमध्ये होणार होता, मात्र पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान तणाव वाढल्यामुळे तो पुढे ढकलला गेला. याच काळात ‘ऑपरेशन सिंदूर’ही झाले. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानला आशा होती की, ढाक्याशी संबंध सुधारून ते भारतावर दबाव आणू शकतील. २०१२ मध्ये हिना रब्बानी खार यांच्या भेटीनंतर प्रथमच पाकिस्तानकडून इतक्या उच्चस्तरीय नेत्याने बांगलादेश गाठले. इस्लामाबादला वाटत होते की, या दौऱ्याने केवळ जुन्या जखमा भरून निघतील असे नाही, तर दक्षिण आशियात भारताच्या राजनैतिक प्रभावालाही आव्हान देता येईल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Modi-Sharif UN Meeting : संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर मोदी-शरीफ येणार आमनेसामने; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच वेळ
पण ढाक्याची स्मृती पाकिस्तानपेक्षा वेगळी आहे. १९७१ च्या मुक्ती युद्धात पाकिस्तानी सैन्याने हजारो निरपराध नागरिकांचा बळी घेतला, शेकडो गावं जाळली आणि हजारो महिलांवर अमानुष अत्याचार केले. या घटनांची जखम बांगलादेशच्या सामूहिक स्मरणातून पुसली गेलेली नाही.
याच कारणामुळे, इशाक दार ढाका पोहोचताच माध्यमांनी सरळ प्रश्न विचारला – “पाकिस्तान अजूनही माफी मागणार का?”
दार यांनी मात्र हा मुद्दा उडवून लावण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितले की, हा वाद आधीच दोनदा मिटलेला आहे, प्रथम १९७४ मध्ये आणि नंतर २००० च्या दशकाच्या सुरुवातीला. दार यांच्या मते, तत्कालीन करार आणि जनरल परवेझ मुशर्रफ यांच्या भेटीत या बाबी निकाली निघाल्या होत्या.
दार यांचे स्पष्टीकरण फार काळ टिकले नाही. त्यांच्या बैठकीनंतर काही तासांतच बांगलादेशचे परराष्ट्र सल्लागार तौहीद हुसेन यांनी दार यांचा दावा थेट फेटाळला. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “१९७१ शी संबंधित प्रलंबित बाबी आजही निकाली न आलेल्या आहेत. भविष्यात चर्चा सुरू राहील, पण माफीचा मुद्दा मिटलेला नाही.” या विधानाने संपूर्ण राजनैतिक समीकरण बदलले. जेथे पाकिस्तानला ‘Warm Welcome’ अपेक्षित होते, तेथे त्यांना उलट ‘कडक संदेश’ मिळाला.
या नाट्याच्या पाठीमागे भारताचा उल्लेख टाळता येत नाही. पाकिस्तानने या दौऱ्याद्वारे भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. पण ढाक्याने उलट भारताच्या भूमिकेशी जवळीक दाखवली. कारण, बांगलादेशसाठी १९७१ हे केवळ स्वातंत्र्याचे वर्ष नाही, तर भारताच्या मदतीमुळे मिळालेलं राष्ट्रपुनर्जन्माचं पर्व आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या अपूर्ण माफीवर बांगलादेश तडजोड करणार नाही, हे स्पष्ट आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Indian Aroma London : आत नेमकं काय घडलं? लंडनमधील एका भारतीय रेस्टॉरंटमध्ये आग लावून… ‘हा’ VIDEO जरूर पाहा
इशाक दार यांना सुरुवातीला राजनैतिक मेजवानी मिळाली खरी; पण त्यानंतर अवघ्या काही तासांतच त्यांना अपमानाचा सामना करावा लागला. पाकिस्तानच्या आशा-अपेक्षा धुळीस मिळाल्या आणि ‘१३ वर्षांनंतरचा मैत्री दौरा’ एका दिवसात कटू आठवणीत बदलला. या घटनेनंतर दक्षिण आशियातील समीकरण आणखी गुंतागुंतीचे होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानला अपेक्षित राजनैतिक फायदा न मिळाल्याने भारताचे स्थान अजून मजबूत झाले, तर बांगलादेशने पुन्हा एकदा १९७१ च्या सत्यावर ठाम राहण्याचा संदेश दिला.