अमेरिकेत कोविड लसीसाठी लागल्या आहेत रांगाच रांगा; जाणून घ्या काय आहे यामागचं कारण? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
न्यूयॉर्क : अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यात यंदाच्या हंगामात फ्लूने गंभीर स्वरूप धारण केले असून, हा संसर्ग कोविड-19 पेक्षाही प्राणघातक ठरत आहे. फ्लूमुळे रुग्णालये ओसंडून वाहत आहेत, आणि डॉक्टरांना मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्येचा सामना करावा लागत आहे. विशेषतः, लसीकरणाचा दर अत्यल्प असल्याने परिस्थिती अधिकच बिकट होत आहे.
यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) च्या अहवालानुसार, सध्याच्या हिवाळी हंगामात अमेरिकेत केवळ 44% प्रौढ आणि 46% मुलांनी फ्लू लस घेतली आहे. कोविड लसीबद्दल साशंक असलेल्या अमेरिकन नागरिकांना आता फ्लूच्या वाढत्या धोक्यामुळे लसीकरणाची आवश्यकता भासू लागली आहे.
कॅलिफोर्नियातील परिस्थिती गंभीर
कॅलिफोर्निया विद्यापीठ, सॅन फ्रान्सिस्को येथील संसर्गजन्य रोगतज्ज्ञ पीटर चिन-हॉन्ग यांच्या मते, संपूर्ण कॅलिफोर्नियात फ्लूची लाट पसरली असून, स्थानिक दवाखान्यांमध्ये 70% हून अधिक श्वसन संसर्गाची प्रकरणे आढळून येत आहेत. 1 फेब्रुवारीपर्यंत कॅलिफोर्नियातील फ्लू संसर्गाची सकारात्मकता दर 27.8% वर पोहोचली आहे, जी कोविड-19 (2.4%) आणि आरएसव्ही (5%) पेक्षा खूपच अधिक आहे.
1 जुलैपासून कॅलिफोर्नियामध्ये फ्लूमुळे किमान 561 मृत्यूंची नोंद झाली असून, त्यातील बहुतांश मृत्यू 65 वर्षांवरील नागरिकांमध्ये झाले आहेत. तसेच, या हंगामात 10 बालकांनी फ्लूमुळे प्राण गमावले, तर याच कालावधीत कोविडमुळे केवळ तीन मुलांचा मृत्यू झाला आहे. यावरून फ्लूचा प्रभाव किती गंभीर आहे, हे स्पष्ट होते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : हेच जगाच्या विनाशाचे संकेत? समुद्रातून वेदनेने तडफडत बाहेर आली दुर्मिळ डूम्सडे फिश, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल
संपूर्ण अमेरिकेत फ्लूची भीषणता
2024-25 च्या फ्लू हंगामात संपूर्ण अमेरिका धास्तावली आहे. आतापर्यंत अंदाजे 29 दशलक्ष नागरिकांना फ्लूची लागण झाली आहे, तर 3.7 दशलक्ष लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. फ्लूमुळे आतापर्यंत 16,000 लोकांचा मृत्यू झाला आहे.
यावर्षी फ्लूचे दोन प्रकार H1N1 आणि H3N2 एकाच वेळी पसरत असल्याने संसर्ग अधिक धोकादायक ठरत आहे. विशेषतः, मुलांमध्ये तीव्र नेक्रोटाइझिंग एन्सेफॅलोपॅथी (ANE) नावाचा दुर्मीळ पण घातक मेंदू संसर्ग दिसून येत आहे.
कोविडसारखी परिस्थिती निर्माण होण्याची भीती
कॅलिफोर्नियामधील रुग्णालयांमध्ये सध्या कोविड-19 महामारीच्या शिखरकाळासारखी परिस्थिती पाहायला मिळत आहे. आयसीयूमध्ये फ्लू, न्यूमोनिया आणि श्वसनाच्या गंभीर समस्यांनी ग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. काही प्रकरणांमध्ये फ्लू संसर्गानंतर MRSA न्यूमोनिया होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. MRSA हा एक जीवाणू असून, अनेक प्रतिजैविके त्याच्यावर परिणाम करत नाहीत, त्यामुळे तो अधिक धोकादायक ठरत आहे.
लसीकरणाची गरज आणि तज्ज्ञांचा इशारा
आरोग्य अधिकाऱ्यांच्या मते, हीच योग्य वेळ आहे लसीकरणाची! जरी फ्लू लस प्रत्येक संसर्गापासून संपूर्ण संरक्षण देत नसली तरी ती गंभीर आजार आणि रुग्णालयात दाखल होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करू शकते. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, पुढील दीड महिना फ्लूची प्रकरणे उच्च पातळीवर राहण्याची शक्यता आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘त्यांना गुन्हेगाराप्रमाणे बेड्या ठोकण्यात आल्या…’ व्हाईट हाऊसने शेअर केला ‘हा’ हृदयद्रावक व्हिडिओ
त्याचबरोबर, वसंत ऋतूमध्ये इन्फ्लूएंझा बी या फ्लूच्या दुसऱ्या लाटेचा धोका असल्याचेही तज्ज्ञांनी सांगितले आहे. या परिस्थितीत लसीकरणासोबतच प्रतिबंधात्मक उपायांची अंमलबजावणी करणे अत्यंत आवश्यक आहे. हात स्वच्छ धुणे, मास्क वापरणे, गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळणे आणि त्वरित लसीकरण करणे हेच या साथीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वात प्रभावी मार्ग ठरणार आहेत.