इम्रान खानचा पत्नी बुशरा बीबीसोबतचा विवाह न्यायलयानं ठरवला बेकायदेशीर, दोघांना सुनावली 7 वर्षांची शिक्षा!

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयाने दोघांचे लग्न बेकायदेशीर ठरवले आहे.

  पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan)  यांच्या अडचणी काही संपताना दिसत नाही आहे. आधीच तुरुंगात असलेले इम्रान खान यांना आणखी एक झटका बसला आहे. इम्रान खाना आणि त्यांची तिसरी पत्नी बुशरा बीबी (Bushara Bibi) यांना सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या दोघांनी निकाह केला होता. मात्र, न्यायालयाने दोघांचे लग्न बेकायदेशीर ठरवले आहे. हे लग्न बेकायदेशीर ठरवण्यात आले म्हणजे दोघांमध्ये निर्माण झालेले संबंधही बेकायदेशीर होते, त्यामुळे त्यांना सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

  नेमकं प्रकरण काय

  पाकिस्तानच्या एका न्यायालयाने शनिवारी हा निर्णय दिला. इम्रान खान आधीच तुरुंगात आहेत. इम्रान आणि त्याच्या पत्नीला सार्वत्रिक निवडणुकीच्या एक आठवडा आधी म्हणजे गैर-इस्लामिक विवाह केल्याबद्दल 7 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयाने दोघांनाही 5 लाख रुपयांचा (पाकिस्तानी) दंड ठोठावला आहे.

  71 वर्षीय इम्रान खान यांना तोशाखाना प्रकरणात इम्रानला अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो तुरुंगात आहे. दुसरीकडे त्यांचा पक्ष पीटीआय (पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ) अडचणीत सापडला आहे. पीटीआय निवडणूक लढवत आहे, मात्र निवडणूक आयोगाने त्यांच्या निवडणूक चिन्हावर बंदी घातली आहे.

  इम्रान खान आणि बुशरा बीबीचं लग्न बेकायदेशीर

  इम्रान खानला बुशरा बीबीशी लग्न करण्याची घाई होती. बुशरा बीबीचा पहिला पती खवर मनेका याने तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. इम्रानने दोन लग्नांमध्ये अनिवार्य ब्रेक किंवा इद्दत पाळण्याच्या इस्लामिक प्रथेचे उल्लंघन केल्याचा आरोप मनेकाने केला होता. मनेकाचा दावा आहे की त्याने नोव्हेंबर 2017 मध्ये आपल्या पत्नीला घटस्फोट दिला. इम्रान खानने पंतप्रधान बनण्याच्या काही महिन्यांपूर्वी फेब्रुवारी २०१८ मध्ये बुशरा बीबीसोबत तिसऱ्या लग्नाची घोषणा केली होती.

  इम्रान खानचे लग्नापूर्वी अवैध संबंध असल्याचा आरोप

  मनेकाने आपली माजी पत्नी आणि इम्रान खान यांच्यावर लग्नापूर्वी अवैध संबंध असल्याचा आरोपही केला होता. इस्लामिक कायद्यानुसार दगडमार करून मृत्यूदंडाची शिक्षा असलेला हा गुन्हा आहे. “शुक्रवारी रावळपिंडीच्या अदियाला जेल संकुलात 14 तास खटल्याची सुनावणी झाल्यानंतर एका दिवसानंतर, वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश कुदर्तुल्ला यांनी शनिवारी हा निकाल दिला.

  या आठवड्याच्या सुरुवातीला इम्रान खानला सायफर प्रकरणात 10 वर्षे आणि तोशाखाना प्रकरणात 14 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. इम्रान खानला 5 ऑगस्ट 2023 रोजी तोशाखाना प्रकरणात अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो तुरुंगात आहे.