फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Maharashtra School Textbook Delay 2026: विदर्भ वगळता सर्व शाळा कालपासून सुरू झाल्या असल्या तरी अजूनही नव्या अभ्यासक्रमानुसार इयत्ता तिसरी, चौथी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांना पुस्तके प्राप्त झाली नाहीत, त्यामुळे आता शिक्षकांनी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने तयार केलेल्या सेतू पुस्तकांच्या माध्यमातून विद्यार्थ्याना शिकवले जावे, असे सुचवले आहे. आता ही पुस्तके विद्यार्थ्यांना ३० जूनपर्यंत मिळतील असे बालभारतीने सांगितले आहे.
राज्यात यंदा इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावी इयत्तांचे अभ्यासक्रम बदलले असून ते नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी संलग्न असतील. या नव्या अभ्यासक्रमांच्या पुस्तकांची निर्मिती बालभारतीकडून दोन महिन्यांपूर्वी सुरू झाली असली तरी एकाच वर्षी चार इयत्तांची पुस्तके तयार करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर होते. शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे पुस्तक छपाईसाठी विलंब झाल्याचे स्पष्टीकरण बालभारतीने दिले.
बालभारतीतील काही सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मध्यंतरी उद्भवलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा फटका कच्च्या मालाला बसल्याने पाठ्यपुस्तक निर्मितीवर परिणाम झाला. या सर्व कारणांमुळे शाळा सुरू होण्याच्या आदल्या दिवशीपर्यंत इयत्ता सहावीची पुस्तके पाहायला मिळाली नाहीत.
SSC GD उत्तरतालिका जाहीर! ‘या’ ५ सोप्या स्टेप्सद्वारे त्वरित डाऊनलोड करा तुमची आन्सर-की
शालेय पाठ्यपुस्तके उपलब्ध होईपर्यंत एससीईआरटीने तयार केलेली सेतू पुस्तके वापरावीत, असे सांगण्यात आल्याचे काही शिक्षकांनी स्पष्ट केले. परंतु, ही पुस्तके ऑनलाईन स्वरूपात असल्याने त्यांची प्रिंट काढून ती वापरावी लागतील. तसेच ही पुस्तके फक्त मराठी माध्यमांसाठी उपलब्ध असल्याने अन्य माध्यमातील शिक्षकांनी काय करावे, असा प्रश्नही शिक्षकांनी उपस्थित केला आहे.
इयत्ता दुसरी, तिसरी, चौथीच्या सर्व माध्यमांची पुस्तके ही डेपोमधून पाठवण्यात आली आहेत. इयत्ता सहावीच्या मराठी माध्यमांच्या पुस्तकांचे प्रिंटिंग पूर्ण झाले असून त्यांच्या वितरणाची प्रक्रिया सुरू असल्याचे बालभारतीच्या संचालक डॉ.अनुराधा ओक यांनी माहिती दिली . तसेच त्या म्हणाल्या की, शाळेच्या पहिल्या दिवसापर्यंत ४० टक्के पुस्तकांचे वितरण पूर्ण होईल, त्यानंतर आठवडाभरात मराठी माध्यमाची सर्व पुस्तके विद्यार्थ्यांच्या हाती मिळतील.






