इराणमध्ये हिंसाचाराची धग कायम; आत्तापर्यंत 3000 जणांचा मृत्यू, सुरक्षा दलाकडून ओपन फायरिंग
तेहरान : गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक घडामोडी घडत आहेत. रशिया-युक्रेन युद्ध अद्यापही सुरु आहे. त्यातच इराणमध्येही परिस्थिती बिघडताना दिसत आहे. इराणमध्ये मृतदेहांचा ढीग साचत आहे. रस्त्यावर मृतदेहांचा खच पडला आहे. हिंसक निदर्शने रोखण्यासाठी खामेनेई सरकारने क्रूर दृष्टिकोन स्वीकारला आहे. इराणमध्ये आत्तापर्यंत तब्बल 3000 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.
इराणमधून भयानक व्हिडिओ समोर येत आहेत. प्रत्यक्षदर्शीच्या माहितीसह अनेक माध्यमांच्या वृत्तानुसार, इराणमध्ये ३००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. इराणमध्ये हा आत्तापर्यंतचा सर्वांत मोठा नरसंहार असल्याचे मानले जाते. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी निदर्शकांवर सुरक्षा दलांनी गोळीबार केल्याचे वृत्त दिले. बहुतेक निदर्शक निशस्त्र होते. गोळीबारात अनेक लोक मृत्युमुखी पडले. हजारो लोक गोळ्या आणि तुकड्यांनी जखमी झाले, तर काहींना डोक्यात इजा झाली. याठिकाणी मोठ्या संख्येने लोक जखमी झाले आहेत. जखमींची एकूण संख्या निश्चित करणे अत्यंत कठीण आहे.
हेदेखील वाचा : Iran Protest 2026: ट्रम्प खवळले अन् खामेनेई घाबरले! तेहरानच्या धमकीनंतर अमेरिकेने उचलले मोठे पाऊल
दरम्यान, परिस्थिती अत्यंत भयानक आणि जीवघेणी बनली आहे. इराणी सरकारने गेल्या काही दिवसांपासून इंटरनेट प्रवेश, आंतरराष्ट्रीय फोन कॉल आणि मोबाईल कनेक्शनवर बंदी घातली आहे.
आता चर्चा नाही, थेट हल्ला; ट्रम्पचे संकेत
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबाबत मोठा संकेत दिला आहे. तेहरानशी वाटाघाटीचा टप्पा संपला आहे. त्याचवेळी, व्हाईट हाऊसमध्ये उच्च अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली, जिथे इराणविरुद्ध लष्करी पर्यायांवर चर्चा करण्यात आली.
अमेरिकेच्या भूमिकेमुळे वातावरण आणखी चिघळणार?
अमेरिका आता राजनैतिक मार्गांनी पुढे जाण्याच्या मनः स्थितीत नाही. ट्रम्प यांनी असेही संकेत दिले की, अमेरिका इराणमधील सरकारविरोधी निदर्शकांना मदत करू शकते. ट्रम्य यांच्या या कठोर भूमिकेमुळे राजकीय छावणीत मतभेद निर्माण होत आहेत.
अमेरिका-इराणमध्ये युद्ध भडकणार
अमेरिका आणि इराणमधील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. दोन्ही देशांमध्ये कोणत्याही क्षणी युद्ध भडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला थेट धमकी दिली आहे. इराणच्या खामेनेई सरकारविरोधी आंदोलनाने तीव्र रुप धारणे केले आहे. त्यातच आता तेहरानने अमेरिकेच्या प्रादेशिक तळांवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे.






