Russia-India Ties: 'कोणत्या देशाकडून काय खरेदी करायचे हे भारतच ठरवतो'; रशियन परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी स्पष्टच संगितले ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी भारताच्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणाचे आणि मोदी-जयशंकर यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले.
“भारत कोणत्या देशाकडून काय खरेदी करायचे हे स्वतः ठरवतो,” असे म्हणत त्यांनी अमेरिकेच्या दबावाला प्रत्युत्तर दिले.
भारत-रशिया संबंधांना लावरोव्ह यांनी “विशेषाधिकारप्राप्त धोरणात्मक भागीदारी” असे संबोधत भविष्यातील व्यापार, संरक्षण आणि तांत्रिक सहकार्यावर भर दिला.
Russia-India trade : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर शुल्कवाढीचे धोरण राबविण्याची भूमिका घेतली असतानाच, रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांचे हे विधान विशेष लक्षवेधी ठरले आहे. रशियन परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह (Sergey Lavrov) यांनी भारत-रशिया( India-Russia Relations) संबंधांना केवळ औपचारिक सहकार्य नव्हे, तर “विशेषाधिकारप्राप्त धोरणात्मक भागीदारी” असे संबोधले.
लावरोव्ह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री डॉ. सुब्रह्मण्यम जयशंकर यांच्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणाला सलाम केला. “भारत जागतिक दबाव न मानता आपल्या राष्ट्रीय हितांनुसार निर्णय घेतो, हे त्याचे सर्वात मोठे बळ आहे,” असे ते म्हणाले. विशेषतः भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याबाबत अमेरिकेने वारंवार दबाव आणला असला तरी, “भारतावर कोणताही धोका नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या मते, “भारताला कोणाकडून काय खरेदी करायचे हे ठरवण्याचा पूर्ण अधिकार आहे. जर अमेरिकेला भारताला तेल विकायचे असेल, तर भारत त्यावर चर्चा करू शकतो; पण कोणत्या देशाकडून काय घ्यायचे हे ठरवणे हा त्याचा सार्वभौम निर्णय आहे.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : China Taiwan War : चीन लवकरच करणार तैवान काबीज; 800 पानांच्या एका कागदपत्रातून ड्रॅगनची कुटील योजना आली जगासमोर
लावरोव्ह यांनी दोन्ही देशांतील नातेसंबंधांचे विस्तृत चित्र मांडले. त्यांनी सांगितले की पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची अलीकडेच चीनमधील तियानजिन येथे एससीओ शिखर परिषदेच्या वेळी भेट झाली होती. याच वेळी, पुतिन डिसेंबरमध्ये नवी दिल्लीला भेट देतील, अशी माहितीही त्यांनी दिली. भारत-रशियामधील अजेंडा अत्यंत व्यापक आहे. यामध्ये व्यापार, संरक्षण, तांत्रिक सहकार्य, वित्त, आरोग्यसेवा, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तसेच एससीओ आणि ब्रिक्स सारख्या बहुपक्षीय मंचांचा समावेश आहे. या सर्व क्षेत्रांमध्ये सातत्याने चर्चासत्रे आणि देवाणघेवाण होत आहेत.
लावरोव्ह यांनी हेही स्पष्ट केले की भारत-अमेरिका व्यापार संबंध आणि भारत-रशिया भागीदारी यांच्यात कोणताही संघर्ष नाही. उलट, भारताने दोन्ही देशांसोबत स्वतंत्र आणि संतुलित भूमिका ठेवली आहे. त्यांनी भारताची तुलना तुर्कीसारख्या स्वाभिमानी देशांशी करत भारताच्या धोरणात्मक भूमिकेची प्रशंसा केली.
लावरोव्ह यांनी जोर देऊन सांगितले की भारत-रशिया संबंध हे केवळ साधे राजनैतिक सहकार्य नाही, तर “विशेषाधिकारप्राप्त धोरणात्मक भागीदारी” आहेत. दोन्ही देश नियमित उच्चस्तरीय देवाणघेवाण करतात. यावर्षी डॉ. जयशंकर रशियाला भेट देतील, तर लावरोव्ह स्वतः भारत दौऱ्यावर येतील, असेही त्यांनी सांगितले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Zaporizhzhia Nuclear Plant : युरोपातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प तीन दिवसांपासून अंधारात; संपूर्ण जगासाठी धोक्याची घंटा
या विधानांमधून एक स्पष्ट संदेश दिला गेला आहे भारत स्वतःच्या निर्णयांवर चालतो, कोणत्याही बाह्य दबावाखाली नाही. अमेरिका, रशिया किंवा अन्य कोणताही देश भारतावर धोरणे लादू शकत नाही. मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणामुळे भारत आज जगातील मोठ्या शक्तींशी तितक्याच आत्मविश्वासाने बोलतो.