'भारतात जन्म घेणार पुढील दलाई लामा'; चीनचा जळफळाट, उत्तराधिकाऱ्याच्या मुद्द्यावरून 'India vs China' जुंपली ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Dalai Lama succession plan : तिबेटी धर्मगुरु दलाई लामा यांच्या उत्तराधिकारीच्या निवडीबाबत भारत आणि चीन यांच्यात पुन्हा एकदा शाब्दिक युद्ध पेटले आहे. चीनकडून वारंवार असा दावा केला जात आहे की, दलाई लामांच्या उत्तराधिकारीची निवड त्यांच्याच संमतीने व्हावी लागेल, अन्यथा ती प्रक्रिया वैध मानली जाणार नाही. मात्र, आता भारताने या मुद्यावर आपली अधिकृत आणि स्पष्ट भूमिका मांडली आहे. भारताने म्हटले आहे की, दलाई लामांना वगळता त्यांच्या उत्तराधिकारीबाबत निर्णय घेण्याचा कोणालाही अधिकार नाही, आणि या पवित्र प्रक्रियेत कोणत्याही बाह्य हस्तक्षेपाचा आम्ही निषेध करतो.
चीन सरकारचा नेहमीचा दावा राहिला आहे की, तिबेट हा त्यांचा अविभाज्य भाग असून, तिथल्या धार्मिक आणि राजकीय नेतृत्वावर केवळ बीजिंगलाच नियंत्रण असावे. याच पार्श्वभूमीवर चीनने म्हटले होते की, दलाई लामांचा उत्तराधिकारी कोण असेल हे चीन सरकारच ठरवेल आणि त्याविना कुठलीही निवड वैध मानली जाणार नाही.
या भूमिकेला आता भारत सरकारकडून स्पष्ट विरोध करण्यात आला आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, भारताने या मुद्यावर जाहीरपणे म्हटले आहे की, “दलाई लामांचा उत्तराधिकारी ठरवण्याचा अधिकार केवळ आणि केवळ दलाई लामांनाच आहे. ही एक धार्मिक आणि आध्यात्मिक प्रक्रिया असून, त्यात कोणत्याही राजकीय शक्तीने हस्तक्षेप करू नये.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India‑US interim trade deal : भारत आणि अमेरिकेत 48 तासांत होणार मोठा व्यापार करार; ट्रम्प यांच्याशी चर्चा सुरू
दलाई लामा 1959 साली तिबेटमधील चिनी दडपशाहीमुळे भारतामध्ये आश्रयाला आले होते. तेव्हापासून ते धर्मशाळामध्ये निर्वासित जीवन जगत आहेत आणि तिथून त्यांनी तिबेटच्या स्वायत्ततेसाठी शांततामूलक लढा सुरू ठेवला आहे. आज दलाई लामा संपूर्ण जगात शांती, करुणा आणि अहिंसेचे प्रतीक मानले जातात. भारताने नेहमीच दलाई लामांचा सन्मान केला असून, त्यांच्या धार्मिक स्वातंत्र्याचे समर्थन केले आहे. भारताची ही भूमिकाच चीनला खटकत आली आहे. चीन दलाई लामांना नेहमी “फुटीरतावादी” असे संबोधतो आणि त्यांच्यावर चीनविरोधी कारवाया केल्याचा आरोप करतो.
दलाई लामा सध्या 89 वर्षांचे असून, त्यांच्या उत्तराधिकारीची निवड हा तिबेटी बौद्ध धर्माच्या अनुयायांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि भावनिक विषय आहे. 14व्या दलाई लामांनंतर कोण त्यांच्या जागी येईल, हे ठरवण्याची प्रक्रिया धार्मिक परंपरेनुसारच होणार आहे. जर चीनने आपल्या राजकीय हितासाठी नवीन “दलाई लामा” तयार करण्याचा प्रयत्न केला, तर ते तिबेटी समुदायासाठी, भारतासाठी तसेच संपूर्ण जागतिक बौद्ध समाजासाठी अस्वीकार्य असेल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : खळबळजनक! पाकिस्तानने चीनच्या मदतीने कशी उभी केली ‘किल चेन’? अमेरिकेच्या विरोधात ड्रॅगनची रणनिती उघड
भारताचा स्पष्ट संदेश आहे – “धार्मिक आणि आध्यात्मिक बाबींमध्ये चीनचा राजकीय हस्तक्षेप आम्हाला मान्य नाही. दलाई लामांचा उत्तराधिकारी ठरवण्याचा अधिकार केवळ त्यांच्याचकडे आहे.” ही प्रतिक्रिया केवळ चीनसाठी इशारा नाही, तर ती जागतिक समुदायालाही भारताच्या तिबेटधोरणाची आठवण करून देणारी आहे. भारताची ही भूमिका भविष्यात तिबेटमधील संघर्षात निर्णायक ठरू शकते, आणि चीनच्या वाढत्या विस्तारवादाविरुद्ध एक मजबूत धार्मिक आणि नैतिक आधार म्हणूनही उभी राहू शकते.