यशोमती ठाकूर यांची बजेटवर टीका (फोटो- ट्विटर)
‘२०४७’चे गाजर दाखवून महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल
कागदावर केला जातोय विकासाचा आभास निर्माण
यशोमती ठाकूर यांची बजेटवर टीका
मुंबई/अमरावती: हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ आकड्यांची फेकाफेकी आणि जनतेच्या डोळ्यांत केलेली धूळफेक आहे. केंद्र सरकारप्रमाणेच राज्य सरकारनेही आता ‘२०४७’चे गाजर दाखवून महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करण्याचा सपाटा लावला आहे. प्रत्यक्षात पदरात काहीच पडत नाही, पण कागदावर मात्र विकासाचा आभास निर्माण केला जात आहे, अशी टिका काँग्रेस नेत्या, माजी महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली.
आज मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा २०२६ -२०२७ सालचा अर्थसंकल्प सादर केला. राज्याची आर्थिक स्थिती चिंताजनक आहे. राज्यावर कर्जाचा भार वाढत चालला आहे. अशा परिस्थितीत आजचा अर्थसंकल्प दिशाहीन वाटतो. थोडक्यात सांगायचे तर, हा अर्थसंकल्प म्हणजे जनतेला दिलेले ‘२०४७’चे आश्वासन नसून, सध्याच्या अपयशावर पांघरूण घालण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे!
या सरकारचा आजवरचा कारभार पाहिला तर एक गोष्ट स्पष्ट होते —घोषणा मोठ्या करायच्या, पण प्रत्यक्षात निधी द्यायचा नाही. अनेक विभागांना जाहीर झालेला निधी कागदावरच राहतो. हे बजेट म्हणजे केवळ आगामी निवडणुकांसाठी तयार केलेला एक ‘इव्हेंट’ आहे, ज्यात जनतेच्या हितापेक्षा सत्ताधाऱ्यांचा प्रचारच जास्त दिसतोय.
अर्थसंकल्पात ठोस तरतुदी नाहीत, केवळ घोषणांचा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचे आश्वासन दिले होते त्याचा विसर. महिलांना लाडकी बहीण योजनेतून २१०० रुपये लाभ देण्याच्या घोषणा केल्या पण कोणतीही वाढ केली नाही. मुख्यमंत्री, अर्थमंत्री, महसुलमंत्री विदर्भातील आहेत परंतू… pic.twitter.com/h0aPhjZHPZ — Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) March 6, 2026
‘लाडकी बहीण’ योजनेत महिलांची घोर फसवणूक
ठाकूर यांनी म्हटले आहे की, निवडणुकीच्या तोंडावर ‘लाडकी बहीण’ योजनेची रक्कम १५०० रुपयांवरून २१०० रुपये करण्याचे गाजर या सरकारने दाखवले होते. मात्र, प्रत्यक्षात या अर्थसंकल्पात ती वाढ न करून सरकारने महाराष्ट्रातील माता-भगिनींचा विश्वासघात केला आहे. केवळ मते मिळवण्यासाठी दिलेली आश्वासने हवेत विरली असून, ही महिलांची शुद्ध फसवणूक आहे.
“Invest Maharashtra हे व्यासपीठ…”; बजेट मांडताना देवेंद्र फडणवीसांचे विधान
शेती आणि शेतकऱ्यांची क्रूर थट्टा !
सरकार म्हणते की शेतकऱ्यांचे उत्पन्न ९ टक्क्यांनी वाढवणार, पण मग गेल्या वर्षी राज्याचा कृषी विकास दर ३.४ टक्क्यांपर्यंत खाली कसा घसरला? याचे उत्तर मुख्यमंत्री किंवा अर्थमंत्र्यांकडे आहे का? सरकारने ‘सरसकट’ कर्जमाफीचा शब्द दिला होता. मग आता केवळ २ लाखांपर्यंतच्या पीक कर्जाचाच विचार का? ही अट कसली? शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे. कृषी उत्पन्न ५५ अब्ज डॉलरवरून थेट ५०० अब्ज डॉलरवर नेण्याची घोषणा म्हणजे निव्वळ हास्यास्पद आणि ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ आहेत. वास्तवाचे भान नसलेले हे सरकार केवळ आकड्यांच्या जोरावर जनतेला मूर्ख बनवत असल्याचे ठाकूर म्हणाल्या.
Maharashtra Budget Live: “…फिर देखना फिजूल है कद आसमान का”; फडणवीस बजेट मांडताना काय म्हणाले?
विदर्भातील सिंचन प्रकल्पांना ‘ठोस’ वाटा नाही !
राज्याचे मुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि महसूल मंत्री हे तिघेही विदर्भातील आहेत, ही विदर्भासाठी अभिमानाची गोष्ट असायला हवी होती. मात्र, दुर्दैवाने याच मंत्र्यांच्या काळात विदर्भातील सिंचन प्रकल्पांना ‘ठोस’ वाटा मिळालेला नाही. केवळ घोषणांचा पाऊस पाडला जातो, पण प्रत्यक्षात निधी अभावी सिंचन प्रकल्प रखडलेलेच आहेत. स्वतःच्या भागाला न्याय देऊ न शकणारे हे मंत्री राज्याचा काय विकास करणार? असा सवाल यशोमती ठाकूर यांनी केला.






