यूक्रेनला मदतीच्या बदल्यात ट्रम्प यांनी मागितली 'ही' मौल्यवान गोष्ट; म्हणाले...(फोटो सौजन्य: नवराष्ट्र टीम)
वॉशिंग्टन: अमेरिकेने आतापर्यंत रशियाविरुद्ध युद्ध लढण्यासाठी युक्रेनला मोठ्या प्रमाणावर आर्थिक, लष्करी आणि राजनैतिक मदत दिली आहे. माजी अध्यक्ष जो बायडेन प्रशासनाने यूक्रेनला मोठ्या प्रमाणात सहाय्य पुरवले असले तरी, डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्हाइट हाउसमध्ये पुनरागमनानंतर ही मदत एकतर्फी राहणार नाही हे स्पष्ट केले आहे. ट्रम्प यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत की, अमेरिका यूक्रेनला विनामूल्य मदत देणार नाही, तर त्याच्या बदल्यात त्यांना काही महत्त्वाच्या गोष्टी हव्यात.
डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी सांगितले की, ते अमेरिकेच्या पाठिंब्याच्या बदल्यात यूक्रेनच्या दुर्मिळ पृथ्वी संसाधनांवर हक्क मिळवण्याचा विचार करत आहेत. यासाठी त्यांनी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांसमोर ट्रम्प यांनी करार करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
BREAKING: President Trump just announced that he is demanding Ukraine to give its rare earth minerals to the United States as payment for all the aid.
“So we’re looking to do a deal with Ukraine where they’re going to secure what we’re giving them with their rare earth and other… pic.twitter.com/M9xZbHTIMl
— George (@BehizyTweets) February 3, 2025
ओव्हल ऑफिसमध्ये ट्रम्प यांचे वक्तव्य
ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, अमेरिका यूक्रेनला त्याच्या युरोपीय भागीदारांपेक्षा जास्त मदत करत आहे. त्यांनी म्हटले की, “आम्ही यूक्रेनला मोठ्या प्रमाणावर लष्करी आणि आर्थिक मदत करत आहोत, पण याचा काहीतरी मोबदला मिळायलाच हवा. यूक्रेनकडे मौल्यवान दुर्मिळ पृथ्वी संसाधने आहेत आणि आम्हाला त्यावर हक्क हवा आहे.”
यूक्रेन डीलसाठी तयार?
ट्रम्प यांनी दावा केला आहे की, त्यांना यासंदर्भात यूक्रेनकडून सकारात्मक संकेत मिळाले आहेत. यूक्रेनला अमेरिकेच्या मदतीची गरज आहे आणि त्यांना त्यांच्या सुरक्षेसाठी अमेरिकेच्या सहकार्याची आवश्यकता आहे. त्यामुळे ते अमेरिकेसोबत दुर्मिळ पृथ्वी पदार्थांबाबत करार करण्यास तयार असल्याचे ट्रंप म्हणाले.
“यूक्रेनकडे उच्च दर्जाची दुर्मिळ पृथ्वी संसाधने आहेत. आम्ही या युद्धात शेकडो अब्ज डॉलर्स खर्च करत आहोत, यामुळे त्याचा काहीतरी मोबदला मिळायलाच हवा. आम्हाला या मौल्यवान संसाधनांची सुरक्षितता हवी आहे आणि यूक्रेन यासाठी तयार आहे,” असे ट्रम्प म्हणाले.
युद्ध किती काळ चालणार?
याआधी ट्रम्प यांनी दावा केला होता की, सत्ता हाती येताच रशिया-यूक्रेन युद्ध लवकर संपवतील. मात्र आता त्यांनी युद्धविरामासाठी वाटाघाटी सुरू असल्याचे म्हटले आहे. अद्याप युद्ध लवकर संपेन की नाही यावर ट्रम्प यांनी काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
यूक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी, “अमेरिका आणि रशिया आमच्या अनुपस्थितीत कोणताही करार करू शकत नाहीत. यूक्रेनशिवाय युद्धविरामाविषयी चर्चा करणे धोकादायक ठरेल.” असे म्हटले होते. यामुळे ट्रम्प यांच्या या नव्या धोरणाचा परिणाम काय होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.