'पाकिस्तानशी निष्ठा असूनही आमच्यावर अन्याय! ख्रिश्चन कुटुंबाची हाक, बिलावल भुट्टोंना पत्रात संताप' ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Pakistan Christian family injustice : पाकिस्तानच्या निष्ठावान नागरिकांनी जर न्यायासाठी आवाज उठवला, तर त्यांचे पाय तोडण्याची धमकी दिली जाते!” हे खळबळजनक वक्तव्य केलं आहे पाकिस्तानातील अपोस्टोलिक चर्चचे अध्यक्ष अफ्राहिम रोशन यांनी. त्यांनी पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP)चे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांना लिहिलेल्या एका पत्रात ख्रिश्चन कुटुंबावर होणाऱ्या अन्यायाची आणि अत्याचाराची गंभीर माहिती दिली आहे. या पत्रातून त्यांनी बिलावल यांना थेट विचारलं आहे. “पाकिस्तानशी निष्ठा असूनही आम्हाला अल्पसंख्याक असल्याचा शाप भोगावा लागतोय का?”
अफ्राहिम रोशन यांचा आरोप आहे की, त्यांच्या दोन मुलांवर मॅथ्यू मार्कस आणि जोनाथन यांच्याविरुद्ध तब्बल ३२ लाख रुपयांची फसवणूक आणि कार चोरीचा खोटा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ही कार (टोयोटा कोरोला, क्रमांक BRK-373) त्यांच्या नावावर कायदेशीर आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. तरीसुद्धा कराची येथील क्लिफ्टन पोलीस ठाण्यात गुन्हा (एफआयआर क्रमांक ३५९/२०२५) नोंदवण्यात आला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 11 वर्षांनी MH17 दुर्घटनेचं गूढ उलगडलं; रशिया दोषी, युरोपियन न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
हा अन्याय थांबवण्यासाठी त्यांनी न्यायालयात धाव घेतली. मात्र न्यायालयाच्या आवारातच पीपल्स लॉयर्स फोरमचे सरचिटणीस अॅडव्होकेट जाहिद हुसेन सुमरो आणि त्यांच्या २० हून अधिक वकिलांनी रोशन यांच्यावर आणि त्यांच्या मुलांवर हल्ला केला. या हल्ल्यावेळी ते म्हणाले, “पुन्हा न्यायालयात आलात, तर पाय तोडू!” या धमकीने संपूर्ण ख्रिश्चन समाजात भीतीचं वातावरण आहे.
अफ्राहिम यांचा दावा आहे की, हल्ल्यावेळी पोलिस घटनास्थळी उपस्थित होते, पण त्यांनी मदतीसाठी कोणतीही कृती केली नाही. न्यायाधीशांना त्वरित कळवण्यात आले, त्यांनी अर्ज दाखल करण्याचे निर्देश दिले. मात्र, आजवर कोणतीही कारवाई झालेली नाही. उलट त्यांच्या दोन्ही मुलांना अजूनही तुरुंगात डांबून ठेवण्यात आलं आहे.
अफ्राहिम यांनी अत्यंत व्यथित होऊन लिहिलं,
“आमच्यावर फक्त शारीरिक हल्ला झाला नाही, तर आमच्या प्रतिष्ठेवर, मानवतेवर आणि न्यायव्यवस्थेवरही हल्ला झाला आहे. आम्ही पाकिस्तानप्रती निष्ठावान आहोत, शांततेसाठी प्रार्थना करतो, पण आमच्यावर असा अन्याय होत आहे कारण आम्ही अल्पसंख्याक आहोत.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : राफेलवर नजर ठेवणारे चिनी हेर जगभर सक्रिय! ग्रीस, युक्रेन आणि इटलीत उघड झाला गुप्त कट
या प्रकारामुळे पाकिस्तानातील अल्पसंख्यांक ख्रिश्चन समुदायात रोष पसरला आहे. बिलावल भुट्टोंना लिहिलेल्या पत्रातून त्यांनी केवळ न्यायाची मागणी केली नाही, तर या विषारी व्यवस्थेविरुद्ध आवाजही उठवला आहे.