इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांची पाकिस्तानच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक; भारताबद्दल केले 'हे' वक्तव्य (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
इस्लामाबाद: पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. याच वेळी इराणने दोन्ही देशांमध्ये मध्यस्थीची भूमिका घेतली आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची शांती दूत म्हणून दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्याच्या प्रयत्नात आहेत. याच तणावाच्या पार्श्वभूमीवर अराघची यांनी सोमवारी (05 मे) पाकिस्तानला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी पाकिस्तानच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा केली. अराघची यांनी पाकिस्तान आणि भारताला संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.
अराघची यांनी पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांच्याशी चर्चा केली. या चर्चेत त्यांनी आशियातील सध्याची परिस्थिती आणि प्रादेशिक समस्येवर चर्चा केली. अराघची यांनी म्हटले की, केवळ संवादानेच दोन्ही देशांमधील समस्या सोडवता येतील. यावर इशाक दर यांनीही सहमती दर्शवली. दरम्यान पाकिस्तान दौरा पूर्ण करुन अराघची गुरुवारी भारत दौऱ्यावर येणार आहेत.
FM of Iran Seyed Abbas Araghchi met with DPM/FM Senator Mohammad Ishaq Dar @MIshaqDar50 in Islamabad. Both the leaders reaffirmed their commitment to strong Pakistan-Iran ties & agreed to boost cooperation in trade, energy & connectivity. They also exchanged views on the evolving… pic.twitter.com/16d5DCdjsO
— Ministry of Foreign Affairs – Pakistan (@ForeignOfficePk) May 5, 2025
ज्म्मू आणि काश्मीरच्या पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कडक कारवाई केली. यानंतर दोन्ही देशांतील थंडावलेले संबंध पुन्हा एकदा बिघडण्यास सुरुवात झाली. भारताच्या कारवाईने पाकिस्तान बिथरला आहे. तसेच संभाव्य लष्करी कारवाईच्या भीतीने भारताला धमक्यांवरुन धमक्या देते आहे. अशातच इराणने दोन्ही देशांतील तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.
भारत आणि पाकिस्तान दोन्ही इराणचे शेजारी देश आहेत. तसेच इराणचे दोन्ही देशांशी संबंध अधिक चांगले आहेत. यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील परिस्थिती इराणसाठी खूप महत्वाची आहे. यामुळे अराघची यांनी म्हटले की, आम्ही दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आणि राजनैतिक संवादाने समस्या सोडवण्याचे आवाहन करतो.
पाकिस्तान आमचा शेजारी देश आहे, तसेच पाकिस्तानशी मैत्रीपूर्ण संबंध देखील आहेत. परंतु आमचे भारताशीही तितकेच चांगले संबंद आहेत. यामुळे दोन्ही देशांनी एकत्र येऊन समस्या सोडवावी.
दरम्यान पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी पुन्हा भारतावर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले की, भारताने कोणतीही कारवाई केल्यास आम्ही त्याचे सडेतोड उत्तर देऊ. दोन्ही देशांतील तणावपूर्ण परिस्थितीला इशाक दार यांनी भारताला जबाबदार धरले आहे.