Iran Israel Ceasefire : ट्रम्पनेच केली होती युद्धबंदीची याचना? इस्रायलवरील हल्ल्यांदरम्यान इराणचा खळबळजनक दावा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Israel Iran War News Marathi : तेहरान/ तेल अवीव : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल आणि इराणमध्ये युद्धबंदीची घोषणा केली आहे. परंतु याला इराणने स्पष्ट नकार दिला असून असा कोणताही करार करण्यात आला नसल्याचे म्हटले आहे. तसेच या घोषणेनंतरही इस्रायल आणि इराणमध्ये क्षेपणास्त्रांचा वर्षाव सुरु आहे. आज (24 जून) सकाळी इराणने एकामागून एक तीन क्षेपणास्त्रे डागली आहेत. तसेच इस्रायलने देखील इराणवर तीव्र हल्ले केले आहेत. इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या एका वरिष्ठ अणुशास्त्रज्ञाचा मृत्यू झाला आहे. तसेच इस्रायलच्या अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, इराणने बेअरशेबा येथे क्षेपणास्त्रे डागली असून यामध्ये तीन इस्रायलींचा मृत्यू झाला आहे.
याच दरम्यान इराणने आणखी एक मोठा दावा केला आहे. खर तर इराणच्या कतारमधील अमेरिकन तळावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांनी युद्धबंदीची घोषणा केली होती. त्यांनी इस्रायल आणि इराणने त्यांच्याकडे युद्धबंदीसाठी संपर्क साधल्याचे म्हटले. त्यांनी सोशल मीडियावर यासंबंधी पोस्ट देखील केली. परंतु इराणने हा दावा नकारला आहे.
ट्रम्प यांच्या या दाव्यानंतर इराणच्या सरकारी माध्यमांनी दावा केला आहे की, मंगळवारी कतारमधील अमेरिकन तळावरील हल्ल्याच्या काही तासानंतर युद्धबंदी लागू करण्यात आली. इराणने म्हटले की, इराणच्या हल्ल्यामुळे अमेरिका आणि इस्रायलने युद्धबंदीसाठी सहमती दर्शवली आहे.
अमेरिकेच्या हल्ल्याला आम्ही पूर्ण ताकदीने उत्तर दिले आहे. यामुळेच आणखी भयावह हल्ल्यांच्या भीतीने इस्रायल आणि अमेरिकेने युद्धबंदीसाठी सहमती दर्शवली आहे. परंतु युद्धबंदी कधी लागू होईल हे सांगण्यात आलेले नाही. इराणच्या हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण आणि इस्रायलमध्ये भीक मागत युद्धबंदीची विनंती केली होती, असा दावा इराणच्या सरकारी माध्यमांनी केला आहे.
याच वेळी इराणने कतारमधील अमेरिकन विमानतळावर केलेल्या हल्ल्यानंतर कतारच्या हवाई संरक्षण यंत्रणेने हे हल्ले हवेत हाणून पाडल्याचे म्हटले आहे. यामध्ये अमेरिकन तळाचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचे कतारने म्हटले आहे. कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने इराणचे बहुतेक हल्ले हाणून पाडल्याचा दावा केला आहे.
ट्रम्प यांची युद्धबंदीचे क्रेडिट घेण्याचे हि पहिलीच वेळ नाही. यापूर्वी भारत आण पाकिस्तानमधील युद्धबंदीचे क्रेडिटही ट्रम्प यांनी घेतले होते. परंतु भारताने यामध्ये तिसऱ्या कोणत्याही पक्षाचा समावेश नाकारला होता. दरम्यान ट्रम्प यांची न केलेल्या कामाचे क्रेडिट घेण्याची सवय मात्र सुधारलेली नाही.