Iran missile strikes Balochistan : इस्रायलविरुद्ध सुरू असलेल्या १२ दिवसांच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणने देशांतर्गत कारवाया वेगात सुरू केल्या असून, त्याचा फटका थेट बलुच अल्पसंख्याकांना बसत आहे. आग्नेय इराणमधील सिस्तान-बलुचिस्तान प्रांतातील घोनिच गावावर इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने ड्रोन आणि लष्करी वाहनांच्या साहाय्याने हल्ला चढवला. या हल्ल्यात ४० वर्षीय एका महिलेचा मृत्यू झाला असून, १२ लोक गंभीर जखमी झाले आहेत.
‘हेरगिरीच्या नावाखाली दडपशाही’ मानवाधिकार संघटनांचा आरोप
हलवाश मानवाधिकार संघटनेने या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया दिली असून, ही कारवाई निष्पाप नागरिकांविरोधातील क्रूर दडपशाही असल्याचा आरोप केला आहे. अहवालानुसार, या हल्ल्यात जखमी झालेल्यांमध्ये स्त्रिया आणि लहान मुलांचाही समावेश आहे. विशेषतः, एका २१ वर्षीय गर्भवती महिलेला आयआरजीसी सैनिकांनी लाथ मारली, ज्यामुळे तिचा गर्भपात झाल्याची माहिती मिळत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : शी जिनपिंग यांची खुर्ची धोक्यात? चीनमध्ये सत्ता बदलाची जोरदार चर्चा, ‘हे’ 5 दावेदार सर्वाधिक चर्चेत
इस्रायली हेर नव्हे, बलुच नागरिकच लक्ष्य
गावकऱ्यांच्या आणि प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, हल्ला पूर्णतः अचानक आणि नियोजित होता. IRGC ने दावा केला आहे की, त्यांना या भागात पाच इस्रायली मोसाद हेर लपल्याची माहिती होती, म्हणून त्यांनी ही कारवाई केली. मात्र, त्यांच्या स्वतःच्या ‘तस्निम न्यूज एजन्सी’ च्या अहवालात देखील कोणत्याही संशयिताचे नाव, फोटो किंवा अटकेची अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे, या कारवाईवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
बलुच समाज पुन्हा लक्ष्य, भेदभावाचे पॅटर्न उघड
बलुच समाजावर इराण सरकारकडून सातत्याने होणाऱ्या दडपशाहीचे हे नवे आणि भीषण उदाहरण आहे. शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक विकासापासून वंचित असलेल्या बलुच समाजाला, सतत देशद्रोही किंवा संशयित म्हणून वागवले जाते. त्यांच्यावर अनेकदा दहशतवाद किंवा हेरगिरीचे आरोप लावून सैनिकी दडपशाही केली जाते, ज्यात सामान्य नागरिकही बळी पडतात.
‘हेरांचा बहाणा, खरा हेतू म्हणजे आवाज दाबणे’
मानवाधिकार संघटनांच्या मते, हेरांच्या उपस्थितीचा दावा हे केवळ एक निमित्त आहे. खरं उद्दिष्ट म्हणजे बलुच नागरिकांचा आवाज दाबणे आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे. IRGC कोणताही पुरावा न देता, कुठल्याही अधिकृत न्यायप्रक्रियेचा अवलंब न करता हल्ले करत आहे, हे अत्यंत गंभीर आणि धोकादायक आहे.
आंतरराष्ट्रीय चौकशीची मागणी
हलवाशसह अनेक आंतरराष्ट्रीय मानवी हक्क संघटनांनी संयुक्त राष्ट्र आणि युरोपियन युनियनकडे मागणी केली आहे की, घोनिच गावातील घटनेची स्वतंत्र आणि पारदर्शक चौकशी व्हावी. तसेच, इराणमध्ये अल्पसंख्याक समुदायांविरोधातील हक्क उल्लंघन थांबवण्यासाठी कठोर आंतरराष्ट्रीय दबाव आणावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : बांगलादेशात हिंदू समाजाचा अल्टिमेटम; संसदेत आरक्षण द्या, अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार
आंतरराष्ट्रीय समुदाय भूमिका
इराणमध्ये सध्या सुरू असलेल्या राजकीय अस्थिरतेचा आणि आंतरराष्ट्रीय तणावाचा सर्वात मोठा फटका अल्पसंख्याक बलुच समाजाला बसत आहे. ‘हेर’ या शब्दाचा वापर करून इराणी शासन निष्पाप नागरिकांवर दडपशाही करत असल्याचे स्पष्ट दिसून येते. आता या घटनेकडे जगाचे लक्ष वेधले जात असून, पुढील काळात यावर आंतरराष्ट्रीय समुदाय काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.