फोटो सौजन्य: सोशल मीडिया
तेहरान: इराणबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. इराण अणुबॉम्ब बनवण्याच्या दिशेने पाऊल टाकत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इराणने अणवस्त्रे तयारी करण्यासाठी लागणाऱ्या युरेनियमचा साठा वाढवला असल्याची माहिती समोर आली आहे. संयुक्त राष्ट्राने याबाबत अणु देखरेख संस्थेच्या अहवालातून याची माहिती दिली आहे. या आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी (IAEA) अहवालानुसार, इराणने 60 टक्के शुद्धतेचे 182.3 किलोग्रॅम समृद्ध युरेनियमचे साठे तयार केले आहेत.
यामुळे जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीच्या (IAEA) अहवालानुसार, 26 ऑक्टोबर 2024 पर्यंत इराणकडे 60% शुद्धतेचे 182.3 किलोग्रॅम समृद्ध युरेनियम साठा होते. या साठ्यांची पातळी शस्त्रास्त्र-श्रेणीच्या 90% शुद्धते एवढी आहे. याशिवाय, इराणचा एकूण युरेनियम साठा 6604 किलोग्रॅमपर्यंत पोहोचला आहे, यामध्ये 852.6 किलोची वाढ होण्याची शक्यता असल्याचे अहवालात म्हटले आहे.
इराण विरोधात ठराव
इराण-इस्त्रायलमधील तमाव शिगेला पोहोचला असताना हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, राफेल IAEA प्रमुख राफेल मारियानो ग्रोसी यांनी इराणला भेट दिली होती. यावेळी राफेल यांनी इराणला युरेनियमचा साठा 60 टक्क्यांनी वाढवू नये असे आवाहन केल होते. या अहवालाच्या पार्श्वभूमीवर इराणविरोधात फ्रान्स, जर्मनी आणि ब्रिटनने कडक ठराव मांडण्याची तयारी केली आहे.
या ठरावावर चर्चा व्हिएन्नामध्ये होणाऱ्या IAEA बोर्ड ऑफ गव्हर्नर्सच्या नियमित बैठकीत होणार असल्याची माहिती मिळाली आहे. याशिवाय, इराणने या ठरावाला विरोध दर्शवला आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी तिन्ही युरोपीय देशांशी चर्चा करत अशा पावलांनी परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होईल, असा इशारा दिला आहे.
फोटो सौजन्य: सोशल मीडिया
मात्र इराणने दावा केला आहे की, त्यांचा आण्विक शस्त्रे बनवण्याचा विचार केवळ शांततापूर्ण उद्दिष्टांसाठी आहे. परंतु IAEA प्रमुख राफेल ग्रोसी यांच्या मते, सध्याच्या युरेनियमच्या साठ्याच्या आधारे इराणकडे अनेक अणुबॉम्ब तयार करण्याची क्षमता आहे. यामुळे इराणवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढला आहे. विशेषतः 2023 मध्ये इराणने IAEA च्या काही अनुभवी निरीक्षकांवर निर्बंध लादले होते, मात्र आता त्यांना पुन्हा नियुक्त करण्याचा विचार सुरू आहे.
इराण अणुकरार
2015 मध्ये अमेरिकेसह पाच शक्तींनी इराणसोबत अणुकरार केला होता. या करारानुसार, इराणला केवळ 3.67% शुद्धतेपर्यंत युरेनियम समृद्ध करण्याची परवानगी होती आणि साठा 300 किलोपेक्षा जास्त ठेवता येणार नव्हता. मात्र, 2018 मध्ये तत्कालीन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एकतर्फी निर्णय घेत करार तोडला. यानंतर इराणने अणुकार्यक्रम गतिमान केला.
इराणने आंतरराष्ट्रीय मागण्यांकडे दुर्लक्ष करून अण्वस्त्र तयार करण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल सुरू ठेवली आहे. जर तणाव वाढला, तर पश्चिम आशिया अस्थिर होऊ शकतो. IAEA च्या अहवालानंतर जगभरातील मोठ्या राष्ट्रांनी यावर त्वरित पावले उचलण्याची गरज आहे, अन्यथा इराणच्या वाढत्या अण्वस्त्र क्षमतेमुळे जागतिक शांतता धोक्यात येऊ शकते.