इस्त्रायलचा रमजानच्या काळात 'हा' मोठा निर्णय; जागतिक स्तरावर खळबळ (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
जेरुसेलम: इस्त्रायलने रविवारी (02 मार्च) मोठी घोषणा केली आहे. इस्त्रायलने गाझाच्या मानवतावादी मदतीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यलयाकडून हा निर्णय जारी करण्यात आला. या निर्णयानुसार, गाझाला अन्नपुरवठा आणि इतर मदत बंद होणार आहे. हा निर्णय अशा वेळी घेण्यात आला आहे जेव्हा रमजान सुरु होणार आहे. त्यांच्या या निर्णयामुळे जागतिक स्तरावर खळबळ उडाली आहे. त्यांच्या या निर्णयाने युद्ध पुन्हा धगधगण्याची शक्यता आहे.
हमासने युद्धविरामाच्या अटी मानण्यास नकार दिल्याने गाझाला मिळणारी बंद
सध्या इस्त्रायल आणि हमासमध्ये युद्धविरामाचा पहिला टप्पा संपला असून दुसऱ्या टप्प्याची चर्चा सुरु आहे. अमेरिकेच्या मध्यपूर्व दूत स्टीव्ह विटकॉफ यांनी युद्धविराम 20 एप्रिलपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव मांडला होता. यामध्ये ओलिसांची सुटका आणि इस्त्रायली सैन्याची गाझातून माघार घेण्याचा मुद्दा होता. परंतु हमासने यावर नकार दिला, यामुळे इस्त्रायलने गाझातील सर्व मानवतावादी पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
हमासची प्रतिक्रिया
हमासच्या एक वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले की, गाझामध्ये शांतता आणि स्थैर्य आणण्याचा एकमेव मार्ग म्हणजे युधविरामाच्या दुसऱ्या टप्प्यावर काम करणे. परंतु त्यांच्या मते इस्त्रायलने गाझातून पूर्णपणे माघार घ्यावी आणि युद्ध थांबवावे. ओलिसांना मुक्त करण्यासाठी ठोस पावले उचलावीत.
युद्धाची पार्श्वभूमी
7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासने इस्त्रायलवर केलेल्या हल्ल्यामुळे गाझा संघर्षाला सुरुवात झाली. या हल्ल्यात 1200 लोक ठार झाले आणि 251 जणांना बंदी बनवण्यात आले. या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात इस्त्रायलने गाझावर हल्ले केले आणि लष्करी कारवाई सुरु केली. संयुक्त राष्ट्राच्या माहितीनुसार, इस्त्रायच्या हल्ल्यात आक्रमणात आतापर्यंत 48 हजार पेक्षा अधिक पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले आहेत. गाझाचे मोठ्या प्रमाणवर नुकसान झाले आहे.
आणखी संघर्ष वाढण्याची शक्यता
इस्रायलने गाझामध्ये अन्न आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा थांबवल्यामुळे तिथल्या लोकांसाठी परिस्थिती आणखीनच बिकट होणार आहे. यामुळे मानवी संकट अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, युद्धविरामाच्या दुसऱ्या टप्प्यावर कोणता निर्णय घेतला जातो, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून आहे.
दरम्यान, इस्लामिक जगतात रमजानचा पवित्र महिना सुरू झाला असून, अनेक अरब देशांमध्ये पहिला उपवास पाळला जात आहे. अशा परिस्थितीत, इस्रायल आणि हमासमध्ये पुन्हा तणाव वाढण्याची शक्यता आहे.