गाझात मदत केंद्रावर इस्रायली सैन्याचा गोळीबार; हमासकडून तीव्र निषेध, म्हणाला 'नरसंहार...' (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
गाझा: गेल्या दोन महिन्यांपासून इस्रायलच्या गाझातील हमासविरोधी कारवाया सुरुच आहेत. दरम्यान पुन्हा एकदा इस्रायलने गाझाच्या दक्षिण भागातील रफाह शहरात पुन्हा एकदा गोळीबार केला आहे. या गोळीबारात ३० पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर ११५ हून अधिक जखण झाले आहे. ही घटना रविवारी (१ जून) सकाळी पॅलस्टिनी नागरिक मदत साहित्य गोळा करण्यासाठी जमले होते त्यादरम्यान घडली. यापूर्वीही अन्न वाटपादरम्यान इस्रायली सैन्याने केलेल्या गोळीबारामुळे लोकांची चेंगराचेंगरी झाली होती. यामध्ये तीन जणांचा मृत्यू आणि ४६ जण जखमी झाले होते.
स्थानिक पत्रकाराने बीबीसीला दिलेल्या वृत्तानुसार, इस्रायली टॅंकने लोकांवर गोळीबार केला.जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पण गाझातील परिस्थिती गंभीर मानवीय संकटाचे प्रतिबिंब म्हटले आहे. गाझाच्या राफा शहरात अमेरिकेच्या मदतीने चालवल्या जाणार्या मदत केंद्राबाहेर ही घटना घडली. हे केंद्र गाझातील लोकांना पायाभूत सुविधांची मदत पुरवते.
सध्या अमेरिकन निधीतून गाझातील लोकांना एका आठवड्यासाठी मदत पुरवली जात आहे. या काळात इस्रायलने अन्न वाटप करण्यासाठी वितरण केंद्र उभारले आहे. ही केंद्र इस्रायली सैनिकांच्या देखेरेखीखाली आहेत. तसेच नव्या व्यवस्थेअंतर्गत गाझाच्या लोकांना गाझा ह्युमॅनिटेरियन फाऊडेशन (GHF)द्वारे मदत केली जाणार आहे.
दरम्यान या घटनेवर प्रतिक्रिया देताना हमासने इस्रायली सैन्यावर रफाहमध्ये भुकेल्या नागरिकांविरोधात इस्रायल नरसंहार करत असल्याचा आरोप केला आहे. अमेरिकेने पाठिंबा दिलेल्या युद्धबंदीला हमासने मान्यता दिली आहे. परंतु इस्रायलने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नसून गाझातील नरसंहार सुरुच ठेवला आहे.
दरम्यान हमासच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इस्रायलचे हल्ले आणि कारवाया पूर्णपणे अस्वीकार्य असल्याचे म्हटले आहे. तसेच हमासने कायमस्वरुपी युद्धबंदीची मागणी केली आहे. हमासने अमेरिकेच्या नव्या युद्धबंदीच्या प्रस्तावाला सहमती दर्शवली आहे. यामध्ये हमास आणि इस्रायलच्या प्रत्येकी १० कैद्याची सुटका आणि ७० दिवसांचा युद्धबंदीचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. हमासने इस्रायलला गाझातून पूर्णपणे माघार घेण्यास सांगितले आहे.
दरम्यान इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी, हमासविरुद्ध सुरु असलेल्या लष्करी कारवाया थाबणार नाहीत असे म्हटले आहे. तसेच गरजू लोकांसाठी मदत सुनिश्चित केली जाईल, पण हमासपर्यंत नाही असेही नेतन्याहूंनी म्हटले आहे. इस्रायलच्या गाझातील कारवायांमुळे पॅलेस्टिनी लोकांमध्ये संतापाची लाट उसळत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर इस्रायलच्या कारवायांना बंदी घालण्याच यावी अशी मागणी केली जात आहे.