फोटो सौजन्य: सोशल मीडिया
वॉश्गिंटन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी सोमवारी व्हाईट हाऊसमध्ये मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली. या विशेष कार्यक्रमात 600 हून अधिक प्रतिष्ठित भारतीय-अमेरिकन सदस्यांसह काँग्रेस सदस्य, सरकारी अधिकारी आणि कॉर्पोरेट नेत्यांनी हजेरी लावली. जो बाडेन यांनी व्हाईट हाऊसमध्ये सर्वात मोठ्या दिवाळी रिसेप्शनचे आयोजन करण्याचा मान मिळाल्याबद्दल आपला अभिमान व्यक्त केला. तसेच त्यांनी यादरम्यान कमला हॅरिस यांचेही कौतुक केले.
दक्षिण आशियाई अमेरिकन समुदायाच्या अमेरिकन समाजातील अनमोल योगदानावर प्रकाश
राष्ट्राध्यक्ष जो बाडेन यांनी आपल्या भाषणात दक्षिण आशियाई अमेरिकन समुदायाच्या अमेरिकन समाजातील अनमोल योगदानावर विशेष प्रकाश टाकला. त्यांनी या समुदायाला “जगातील सर्वात वेगाने वाढणारा आणि जोडलेला समुदाय” म्हटले आणि त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव केला. बायडेन यांनी म्हटले की, दक्षिण आशियाई अमेरिकन समुदायाने अमेरिकेच्या जीवनाचा प्रत्येक पैलू समृद्ध केला आहे. यामध्ये राजकारण, व्यवसाय, विज्ञान, कला आणि शिक्षण यांचा समावेश आहे. आज व्हाईट हाऊस या सणाला आनंदाने आणि अभिमानाने साजरे करत आहे. अमेरिकेसाठी ही एक महत्वपूर्ण घटना आहे, असेही जो बायडेन यांनी म्हटले.
दिवाळीच्या या प्रसंगी, बायडेन यांनी अमेरिकन समाजात विविधतेच्या आव्हानांना सामोरे जात असलेल्या एकात्मतेच्या महत्त्वावर भर दिला. अमेरिकन लोकशाहीच्या मूल्यांवर दृढ राहून, एकत्रितपणे काम करणे हे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या परिवर्तनशील कालखंडात एकता आणि ऐतिहासिक जाणीवेची गरज अधोरेखित करताना, त्यांनी उपस्थितांना ‘अमेरिकेची कल्पना’ गृहित धरू नये असे सांगितले.
कमला हॅरिस यांचे कौतुक
व्हाईट हाऊसच्या या दिवाळी समारंभात जो बायडेन यांनी उपाध्यक्ष कमला हॅरिस यांचे कौतुक केले. बायडेन यांनी म्हटले की, कमला हॅरिस प्रचार दौऱ्यावर असल्यामुळे या कार्यक्रमात उपस्थित राहू शकल्या नाहीत, पण कमला हॅरिस “विश्वासू, हुशार, आणि अत्यंत अनुभवी” सहकारी आहेत असे म्हणून त्यांना गौरविले.
2003 मध्ये व्हाईट हाऊसमध्ये दिवाळीची सुरुवात झाली
व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी करण्याची परंपरा 2003 मध्ये राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांच्यापासून सुरू झाली. यानंतर बराक ओबामा, डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन यांनी ही परंपरा पुढे नेली. दरवर्षी हा सण व्हाईट हाऊसमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा सण दक्षिण आशियाई समुदायाच्या अमेरिकन संस्कृतीतील वाढत्या सहभागाचे प्रतीक आहे. तथापि, 2018 मध्ये, महत्त्वपूर्ण मध्यावधी निवडणुकांमुळे व्हाईट हाऊसमध्ये औपचारिक दिवाळी साजरी करण्याच्या 15 वर्षांच्या जुन्या परंपरेत व्यत्यय आला होता.
हे देखील वाचा- इजिप्तचा गाझामध्ये इस्त्रायल-हमास युद्धबंदीचा प्रस्ताव; चार ओलिसांची होणार सुटका?