नासातील भारतीय वंशाच्या अधिकाऱ्याने गमावली नोकरी; ट्रम्प यांच्या आदेशाचा परिणाम (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन: सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेचा विषय बनत आहेत. त्यांनी त्यांच्या अनेक निर्णयाने जगाला हादरवून टाकले आहे. परंतु यामुळे अनेकजण त्यांच्या विरोधात गेले आहेत. तसेच ट्रम्प यांच्या निर्णयांमुळे अमेरिकेतील लोकांना देखील अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे अनेक अमेरीकी ट्रम्प विरोधात रस्त्यावर होते. ट्रम्प विरोधात ‘Hands Off’ आंदोलन देखील काढण्यात आले होते.
दरम्यान ट्रम्प यांच्या निर्णयाचा फटका केवळ सामान्य नागरिकांना नाहीच उच्चस्तरीय अधिकाऱ्यांना देखील बसला आहे. ट्रम्प यांच्या निर्णयामुळे अमेरिकन अंतराळ संस्थाने भारतीय वंशाच्या नीला राजेंद्र यांना पदावरुन काढून टाकले आहे. त्या नासाच्या विविधता, समता आणि समावेशनाच्या प्रमुख होत्या. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकारी आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे, ज्यामध्ये देशभरातील सर्व विविधता कार्यक्रम बंद करण्याचे आणि अशा नियुक्त्या तत्काळ संपुष्टात आणण्याचे निर्देश आहेत.
नीला राजेंद्र यांना वाचविण्याच्या प्रयत्नात नासाने त्यांचे पद बदलून ‘टीम एक्सलन्स अँड एम्प्लॉयी सक्सेस ऑफिसचे प्रमुख’ असे ठेवले.तथापि, त्यांची भूमिका तशीच राहिली. मार्चमध्ये नासाने त्यांचा विविधता विभाग बंद केला, परंतु त्यावेळी नीला राजेंद्र या कारवाईतून वाचल्या.
अर्थसंकल्पीय संकटामुळे नासाने गेल्या वर्षी सुमारे ९०० डीईआय कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. त्यावेळी नीला राजेंद्र यांना काढून टाकण्यात आले नव्हते. पण एप्रिलमध्ये ट्रम्प प्रशासनाने कडक कारवाई केल्यानंतर त्यांनाही पदावरून काढून टाकण्यात आले. नीला राजेंद्र यांनी अनेक वर्षे नासामध्ये नेतृत्वाच्या भूमिका बजावल्या आणि स्पेस वर्कफोर्स २०३० सारख्या उपक्रमांना चालना दिली, ज्याचा उद्देश नासामध्ये महिला आणि अल्पसंख्याकांचे प्रतिनिधित्व वाढवणे हा होता.